हेरगिरीसाठी पुन्हा एकदा चीनचे जहाज हिंदी महासागरात

नवी दिल्ली – चिनी नौदलाचे टेहळणी जहाज पुन्हा एकदा हिंदी महासागरात दाखल झाले आहे. भारताच्या सागरी हद्दीपासून हे जहाज दूर असले तरी चिनी नौदलाच्या या जहाजावर भारताची करडी नजर रोखलेली असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. पुढच्या आठवड्यातत डीआरडीओ क्षेपणास्त्राची चाचणी करणार आहे. त्याच्या आधी चिनी नौदलाच्या जहाजाचा हिंदी महासागरातील प्रवेश, या चाचणीची माहिती मिळविण्यासाठीच असल्याचा दावा केला जातो. याआधीही चीनने अशाप्रकारे भारताच्या क्षेपणास्त्र चाचण्यांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला होता.

Chinese shipहिंदी महासागरातील भारताचा नैसर्गिक प्रभाव चीनला कायम अस्वस्थ करीत आला आहे. चीनची इंधन तसेच व्यापारी वाहतूक याच क्षेत्रातून होत असल्याने, भारत मलाक्काच्या आखातात कुठल्याही क्षणी चीनची ही वाहतूक रोखू शकतो, या चिंतेने या देशाला ग्रासले आहे. भारतीय नौदलाचे या क्षेत्रातील वर्चस्व संपविण्याची तयारी चीनने केली आहे आणि लवकरच चीनचे नौदल यासाठी प्रयत्न करणार असल्याचा इशारा चीनच्या एका विश्लेषकाने दिला होता. त्या पार्श्वभूमीवर, चिनी नौदलाच्या जहाजाचा हिंदी महासागरातील वावर लक्ष वेधून घेणारा ठरतो.

पुढच्या आठवड्यात डीआरडीओकडून पाणबुडीतून डागल्या जाणाऱ्या ‘के-४’ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली जाईल. याची पूर्वसूचना जारी करण्यात आलेली आहे. या चाचणीच्या काळात कुठल्याही देशाची जहाजे व विमाने यांना या क्षेत्रात सुरक्षेच्या कारणास्तव प्रवेश करता येणार नाही. ‘क-े४’ क्षेपणास्त्राची मारक क्षमता सुमारे २२०० किलोमीटर इतकी असल्याचे सांगितले जाते. या क्षेपणास्त्र प्रक्षेपित केल्यानंतर किती उंचावर जाऊन त्यानंतर आपले लक्ष्य टिपते याची नोंद घेण्यासाठी चीन उत्सुक असल्याचे संकेत मिळत आहेत. यासाठीच चीनच्या नौदलाचे युआन वँग-६ हे हेरगिरी करणारे जहाज हिंदी महासागरात दाखल झाले असावे, असे माध्यमांचे म्हणणे आहे. भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाला मिळत असलेल्या यशामुळे चीन कमालीचा अस्वस्थ झाला असून बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या आघाडीवर भारताला मिळालेले यश चीनला देखील मागे टाकणारे असल्याचे बोलले जाते. काही दिवसांपूर्वी भारताने एडी-१ क्षेपणास्त्रभेदी इंटरसेप्टरची चाचणी करून अशी क्षमता असलेल्याअमेरिका, रशिया, इस्रायल यांच्या श्रेणीत स्थान मिळविले होती.

leave a reply