चीनच्या ‘वुहान’मध्ये आलेल्या नव्या साथीच्या हजार रुग्णांचे विलगिकरण

बीजिंग – चीनच्या वुहानमधील परिस्थिती आता पुर्णपणे नियंत्रणात असल्याचा दावा चीनची राजवट करीत आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी वुहानला भेट देऊन याचे वीडियो प्रसिद्ध केले होते. मात्र या शहराला नव्या साथीने ग्रासल्याचे समोर येत आहे. चीनच्या आरोग्य यंत्रणांनी या नव्या साथीच्या हजाराहून अधिक रुग्णांचे विलगिकरण केले आहे.

पुढच्या दोन दिवसात वुहान शहराला हुबेई प्रांतातील तीन शहरांशी जोडणारी रेल्वे वाहतूक सुरू करण्याचे येथील प्रशासनाने जाहीर केले होते. ही घोषणा झाली असली तरी, चीनच्या स्थानिक प्रशासनाने वुहानच्या नागरिकांना घराबाहेर पडू नका, अशी ताकिद दिली आहे. इमर्जन्सी असल्याशिवाय घर सोडू नका, असे इथल्या नागरिकांना बजावले आहे. गेल्या काही दिवसांपासून वुहान आणि चीनच्या इतर भागात नव्या साथीचे रुग्ण आढळल्यानंतर हा इशारा देण्यात आला आहे.

या नव्या साथीचे १०७५ रुग्ण असल्याची माहिती स्थानिक नागरिक व काही माध्यमे दबक्या आवाजात देत आहेत. कोरोनाव्हायरसप्रमाणे या नव्या साथीच्या रुग्णांमधील आजाराची लक्षणे स्पष्ट होऊ शकलेली नाहीत. त्यामुळे या रुग्णांचे विलगिकरण केले असून त्यांना वैद्यकीय निरिक्षणाखाली ठेवल्याचे बोलले जाते. त्याचबरोबर चीनने वुहानमधील एक कोटीहून अधिक जणांची वैद्यकीय चाचणी घेण्याचा निर्णय घेतल्याचे, चिनी माध्यमांनी म्हटले आहे.

वुहानमध्ये आलेल्या या नव्या साथीबद्दल अधिक माहिती देण्यास चीन तयार नाही. ही साथ म्हणजे कोरोनाव्हायरसचा पुढचा भाग आहे का, कि वेगळीच साथ आहे, याची माहिती इतक्यात तरी चीनकडून येण्याची शक्यता नाही. मात्र चीनमध्ये दाखल झालेल्या या नव्या साथीमुळे जगाच्या चिंतेत नवी भर पडू लागली आहे.

leave a reply