काबुलमधील गुरुद्वारावरील हल्ल्याच्या सूत्रधाराला अटक

अफगाणी सुरक्षा यंत्रणांची संयुक्त कारवाई

२५ मार्च रोजी अफगाणिस्तानच्या काबुलमधील गुरुद्वारावर झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार मौलवी अब्दुल्ला उर्फ अस्लम फारुखी याला अटक करण्यात आली आहे. वीस साथीदारांसह अटक करण्यात आलेला फारुखी पाकिस्तानी आहे. लष्कर-ए-तोयबा आणि हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनांशी मौलवी अब्दुला याचे संबंध होते. सध्या तो अफगाणिस्तानातील ‘खोरासान’ या दहशतवादी संघटनेसाठी काम करीत होता.

काबुलमधील या हल्ल्यामध्ये २२ शीखधर्मियांचा बळी गेला होता. या हल्ल्याची जगभरातून निर्भत्सना करण्यात आली होती. भारताने कठोर शब्दात याचा निषेध नोंदविला होता. त्या पार्श्वभूमीवर अफगाणी सुरक्षा यंत्रणांनी संयुक्त कारवाई करुन मौलवी अब्दुल्ला याला त्याच्या वीस साथिदारांसह ताब्यात घेतले. मौलवी अब्दुला लष्कर-ए-तोयबाचा माजी सदस्य आहे. त्याने पाकिस्तानच्या ‘आयएसआय’कडून संरक्षण मिळत असलेल्या तालिबानच्या हक्कानी गटासाठीही काम केले होते.

सध्या मौलवी अब्दुल्ला ‘इस्लामिक स्टेट ऑफ खोरासान प्रोविंस’ (आयएसकेपी) या दहशतवादी संघटनेचा आमिर म्हणून काम करीत होता. भारताने काश्मिरमध्ये केलेल्या कारवाईचा सूड घेण्यासाठी मौलवी अब्दुल्लाने काबुलमधील भारतीय दूतावासाला लक्ष्य करण्याचे ठरविले होते. मात्र या दुतावासाला पुरविलेल्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमुळे मौलवी अब्दुला हा दहशतवादी हल्ला चढवू शकलेला नाही.

अफगाणिस्तानातील पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी गट या देशातील भारतीय हितसंबंधांना लक्ष्य करण्याचे कटकारस्थान आखत आले आहेत. या कारस्थानाच्या मागे पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना आयएसआय असल्याचे उघड झाले होते. अफगाणी गुप्तचर यंत्रणा आणि अमेरिकेनेही हे मान्य केले होते. यासाठी पाकिस्तानचे भारतविरोधी धोरण जबाबदार असल्याचा आरोप भारताने केले होते.

तरीही पाकिस्तानने आपले हे धोरण सोडून दिलेले नाही. आता लवकरच अफगाणिस्तानवर तालिबानचे राज्य येईल, त्यानंतर त्याचा वापर भारताविरोधात करता येईल, असे स्वप्न पाकिस्तानचे लष्करी अधिकारी व भारतद्वेष्टे गट करीत आहे. यानंतर पाकिस्तानने आपल्या कुटिल कारवाया प्रत्यक्षात उतरविण्याचे संकेत मिळत आहेत. काबुलच्या गुरुद्वारावरील हल्लाचा सूत्रधार मौलवी अब्दुल्लाचे पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनांशी असलेले संबंध हेच उघड करीत आहे.

leave a reply