अफगाणिस्तानच्या कंदहारमध्ये तालिबानच्या दहशतीविरोधात हजारोजण रस्त्यावर उतरले

काबुल – तालिबानचे उगमस्थान आणि राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कंदहारमध्येच या दहशतवादी संघटनेविरोधात निदर्शने सुरू आहेत. सुमारे तीन हजार कुटुंबांनी तालिबानच्या विरोधात तीव्र निदर्शने केली. तालिबानचे दहशतवादी स्थानिकांना राहत्या घरांमधून हाकलून त्या घरांचा ताबा घेत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. या निदर्शनांमध्ये महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

तालिबानच्या दहशतवाद्यांनी कंदहारमधील आर्मी कॉलनीमध्ये राहणार्‍या सुमारे तीन हजार कुटुंबांना पुढच्या तीन दिवसात घरे रिकामी करून निघून जाण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये अफगाणी लष्कराच्या निवृत्त अधिकार्‍यांच्या घरांचा समावेश आहे. तर काही घरांमध्ये सर्वसामान्य गेली कित्येक दशकांपासून वास्तव्य करून आहेत. तालिबानच्या दहशतवाद्यांना ही घरे उपलब्ध करून देण्यासाठी हे फर्मान काढण्यात आले. काही दहशतवाद्यांनी बंदूकीच्या धाकावर येथील कुटुंबांचे सामान बाहेर फेकून घराचा ताबा घेतल्याचा प्रकारही घडला आहे.

या बेबंदशाहीच्या विरोधात मंगळवारी सकाळी कंदहारमधील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून निदर्शने केली. कंदहारमधील गव्हर्नर हाऊसच्या समोर अफगाणी नागरिकांनी तालिबानविरोधात घोषणा दिल्या. या निदर्शनांमध्ये तरुण, वृद्ध तसेच महिला व मुले देखील सहभागी झाले होते. संतप्त नागरिकांच्या या निदर्शनांमुळे कंदहारमधील वाहतूक व्यवस्था काही काळासाठी प्रभावित झाली होती. कंदहारमधील या निदर्शनांवर तालिबानच्या प्रवक्त्याने प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

काबुल ही अफगाणिस्तानची राजधानी असली तरी कंदहार हे तालिबानचे मुख्य सत्ताकेंद्र म्हणून ओळखले जाते. याआधी कंदहारमधून तालिबानची सर्व सूत्रे हलविली जात होती. अफगाणिस्तानच्या इतर भागांच्या तुलनेत कंदहारमध्ये तालिबानचा मोठा प्रभाव असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे कंदहारमध्ये अफगाणी जनतेने तालिबानच्या विरोधात रस्त्यावर उतरुन केलेल्या निदर्शनांचे महत्त्व वाढले आहे.

दरम्यान, गेल्या महिन्याभरापासून अफगाणिस्तानच्या वेगवेगळ्या भागात तालिबानविरोधातील असंतोष उफाळून समोर येत आहे. यामध्ये अफगाणी महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे. कंदहारमधील निदर्शनातही महिलांचा सहभाग लक्षवेधी होता. पण आपली राजवट महिलांच्या हितांचे रक्षण करणारी असून अफगाणी महिला आपल्या समर्थनार्थ असल्याचे दाखविण्यासाठी तालिबानने प्रयत्न सुरू केले आहेत.

यासाठी दोन दिवसांपूर्वी काबुलमध्ये बुरखाधारी महिलांनी तालिबानच्या समर्थनार्थ निदर्शने काढल्याची बातमी तालिबानसमर्थक माध्यमांच्या गटांनी प्रसिद्ध केली होती. तसेच काबुल विद्यापीठातील विद्यार्थीनींनी देखील तालिबानला समर्थन दिल्याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले होेते. पण तालिबानने धमकी देऊन आपल्याला बुरखा परिधान करायला लावल्याचा आरोप काबुल विद्यापीठातील विद्यार्थीनींनी केला आहे. त्यामुळे अफगाणी महिला आपल्यासोबत असल्याच्या तालिबानच्या प्रचारातील हवा निघून गेली आहे.

leave a reply