युरोपच्या बाल्कन क्षेत्रातील ‘बोस्निया-हर्झेगोविना’चे विघटन होण्याचा धोका

- आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा इशारा

साराजेव्हो -युरोपच्या बाल्कन क्षेत्रातील ‘बोस्निया ऍण्ड हर्झेगोविना’चे विघटन होण्याचा धोका आहे, असा इशारा आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी दिला. गेल्या काही दिवसात या देशातील तीन राष्ट्राध्यक्षांपैकी एक असणार्‍या मिलोरॅड डॉडिक यांनी ‘रिपब्लिका सपर्स्का’ या प्रांताला स्वतंत्र देश म्हणून घोषित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांचे प्रयत्न यशस्वी झाल्यास बाल्कन क्षेत्रात पुन्हा युद्धाला तोंड फुटेल, अशी भीती युरोपिय अधिकारी व विश्‍लेषकांनी व्यक्त केली.

युरोपच्या बाल्कन क्षेत्रातील ‘बोस्निया-हर्झेगोविना’चे विघटन होण्याचा धोका - आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा इशारागेल्या शतकातील अखेरच्या दशकात युरोपातील ‘रिपब्लिक ऑफ युगोस्लाव्हिया’चे विघटन झाले. या विघटनानंतर पेटलेल्या संघर्षातून सात देशांची निर्मिती झाली होती. त्यात क्रोएशिया, स्लोवेनिया, सर्बिया, नॉर्थ मॅसिडॉनिआ, बोस्निया ऍण्ड हर्झेगोविना, मॉंटेनेग्रो व कोसोवो यांचा समावेश आहे. यातील कोसोवोला अद्याप आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व देशांनी मान्यता दिलेली नाही. तर बोस्निया ऍण्ड हर्झेगोविना स्वतंत्र राष्ट्र असले तरी त्यातील तिन्ही प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली आहे. फक्त लष्कर, न्याययंत्रंणा व करव्यवस्था या तीन बाबी केंद्रीय राजवटीच्या अधिकारात आहेत.

बोस्निया ऍण्ड हर्झेगोविनाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सातत्याने वांशिक तणाव असून ‘बोस्नियन’, ‘सर्बियन’ व ‘क्रोएट्स’ यांच्यात सातत्याने खटके उडत असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही वर्षात सर्बियन वंशाचे गट अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांचे प्रतिनिधित्व करणारे राष्ट्राध्यक्ष मिलोरॅड डॉडिक यांनी ‘रिपब्लिका सपर्स्का’ या प्रांताला स्वतंत्र देश बनविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी आरोग्य क्षेत्रात स्वतंत्र यंत्रणा उभारली असून न्याययंत्रणेशी निगडित काही निर्णयांना मान्यता देण्यासही नकार दिला आहे.

युरोपच्या बाल्कन क्षेत्रातील ‘बोस्निया-हर्झेगोविना’चे विघटन होण्याचा धोका - आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा इशारात्याचवेळी बोस्निया ऍण्ड हर्झेगोविनाच्या लष्कर तसेच अंतर्गत सुरक्षायंत्रणेचा भाग असणार्‍या पोलीसदलातील सर्बवंशियाचे वेगळे दल स्थापन करण्याचीही योजना आखल्याचे समोर येत आहे. युरोपिय महासंघाने या देशासाठी नियुक्त करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना मान्यता देण्यासह डॉडिक यांनी नकार दिला आहे. या प्रकरणात युरोप तसेच अमेरिका मवाळ भूमिका घेत असल्याचे आरोपही होऊ लागले आहेत.

डॉडिक यांच्या हालचालींमागे रशिया व सर्बिया या देशांचे समर्थन असल्याचे मानले जाते. युरोपिय महासंघ तसेच नाटोच्या युरोपातील विस्ताराला रशियाचा विरोध आहे. याच विरोधाचा भाग म्हणून रशिया बाल्कन देशांमधील वांशिक गटांना प्रोत्साहन देत असल्याचा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात येतो. युरोपिय महासंघाच्या अनास्थेमुळे रशियाच्या धोरणाला अधिक बळ मिळत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. गेली अनेक वर्षे बाल्कन देश महासंघाचे सदस्यत्व मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र त्याला विशेष प्रतिसाद न मिळाल्याने या देशांमध्ये नाराजीची भावना आहे. याच गोष्टीचा रशिया फायदा उचलत असल्याकडे विश्‍लेषकांनी लक्ष वेधले आहे.

याच पार्श्‍वभूमीवर, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी म्हणून नियुक्त झालेल्या ख्रिस्तिअन श्मिड्ट यांनी बोस्निया ऍण्ड हर्झेगोविनाच्या विघटनाचा इशारा दिला आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने योग्य वेळेत हालचाली केल्या नाहीत तर या भागात पुन्हा युद्धाला तोंड फुटू शकते व विघटनवादाच्या प्रक्रियेला बळ मिळेल, असेही श्मिड्ट यांनी बजावले आहे.

leave a reply