पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात

नवी दिल्ली – केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात अनुक्रमे ५ रुपये आणि १० रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यांनी देखील व्हॅट कमी करून सामान्यांना दिलासा देण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपातीमुळे सामान्य नागरिकांसह रब्बी हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकर्‍यांना देखील मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल.

पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपातगेल्या ३६ दिवसात पेट्रोलचे दर ८.८५ रुपयांनी वाढले आहेत. देशातील जवळपास प्रत्येक शहरात पेट्रोल प्रतिलिटर १०० रुपयांच्यावर पोहोचले आहे. तर डिझेलदेखील प्रति लिटर १०० रुपयांजवळ पोहोचले. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा परिणाम महागाईवर दिसून येत होता. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याची मागणी गेल्या काही दिवसात जोर धरु लागली होती.

दिल्लीत पेट्रोलचे दर प्रतिलिटर ११०.०४ रुपये आणि डिझेल ९८.४२ रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोलचे दर ११५.८५ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर प्रति लिटर १०६.६२ रुपये इतके आहेत. केंद्र सरकारने २०२० च्या मार्च आणि मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादनत शुल्कात अनुक्रमे १३ रुपये आणि १६ रुपयांची वाढ केली होती. मात्र आता उत्पादन शुल्कात कपात करण्यात आल्याने महागाई कमी करण्याच्या दृष्टीने देखील मदत मिळेल.

leave a reply