जम्मू-काश्मीरच्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान शहीद

श्रीनगर – काश्मीरच्या कुपवाडामध्ये ‘केंद्रीय राखीव पोलीस दला’च्या(सीआरपीएफ) गस्ती पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन जवान शहीद झाले. या हल्ल्याची जबाबदारी ‘लश्कर-ए-तोयबा’च्या ‘द रजिस्टेंस फ्रंट'(टीआरएफ) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. गेल्या दोन दिवसातील हा दुसरा सर्वात मोठा हल्ला आहे.

सोमवारी संध्याकाळच्या सुमारास सीआरपीएफच्या ९२ बटालियनचे जवान कुपवाडातल्या हंडवारामध्ये गस्त घालत होते. त्यावेळी मोटारीमधून आलेल्या दहशतवाद्यांनी या जवानांवर ग्रेनेड हल्ला चढविला. त्यानंतर जवानांवर बेछूट गोळीबार करण्यास सुरुवात केली. जवानांनी प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केल्यानंतर दहशतवाद्यांनी इथून पळ काढला. पण तोपर्यंत सीआरपीएफचे तीन जवान जागीच ठार झाले होते. शहीद झालेल्या या जवानांची नावे कॉन्स्टेबल संतोष कुमार मिश्रा, कॉन्स्टेबल अश्विनी कुमार यादव आणि कॉन्स्टेबल चंद्रशेखर अशी आहेत. या हल्ल्यात सीआरपीएफचे सात जवान जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. तसेच एका स्थानिकाचा या हल्ल्यात बळी गेल्याचे सांगितले जाते.

या हल्ल्याची जबाबदारी ‘टीआरएफ’ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली. ‘जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर या संघटनेने जम्मू आणि काश्मीरमध्ये पाय रोवायला सुरुवात केली आहे. सोमवारच्या या हल्ल्याला काही तास उलटत नाही तोच मंगळवारी बुडगाममध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला चढविला. यात एक जवान आणि चार जण जखमी झाले आहेत. तसेच सोमवारी श्रीनगरमध्ये ‘केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला’च्या (सीआयएसएफ) गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला चढविला होता. यात ‘सीआयएसएफ’चा एक जवान जखमी झाला होता. शनिवारी मध्यरात्री हंडवारामध्ये दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाच जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारीही लश्करच्या ‘टीआरएफ’ने स्वीकारली होती.

‘जैश-ए-मोहम्मद’, ‘लश्कर-ए’-तोयबा’ यासारख्या दहशतवादी संघटना जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले चढविण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. १० महिन्यापूर्वी काश्मीरमधून ३७० कलाम हटविल्यानंतर काश्मीरमधील शांतता पाकिस्तान आणि दहशतवादी संघटनांना अस्वस्थ करीत आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना भारतीय सीमेत घुसविण्यासाठी सीमेवर सातत्यताने गोळीबार करीत आहे. भारताचे जवान याला जोरदार प्रत्युत्तर देत आहे. काश्मीरमधील बर्फ वितळत असून येत्या काही दिवसात घुसखोरीचे प्रयत्न आणखी वाढतील असा इशारा गुप्तचर यंत्रणांनानी दिला आहे.

leave a reply