जगभरात कोरोनाव्हायरसचे अडीच लाखांहून अधिक बळी

बाल्टिमोर – जगभरात कोरोनाव्हायरसमुळे अडीच लाखाहून जणांचा बळी गेला असून ३६ लाखांपेक्षा अधिक जणांना या साथीची लागण झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी या साथीने दगावलेल्यांच्या संख्येत घट झाल्याचे जॉन हॉप्किन्स विद्यापीठाने आपल्या माहितीत म्हटले आहे. दरम्यान, जगभरातील काही देश कोरोनाच्या बळींची संख्या लपवित असल्याचा दावा इटलीतील एका गटाने केला आहे.

जॉन हॉप्किन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासात कोरोनाव्हायरसने जगभरात ३,८१० जणांचा बळी घेतला आहे. यामुळे जगभरातील कोरोनाच्या मृतांची संख्या २,५१,९५५ वर गेली आहे. यामध्ये अमेरिकेतील ६८,६८९ जणांचा समावेश आहे. गेल्या चोवीस तासात अमेरिकेत १०१५ जणांचा बळी गेल्याची माहिती, अमेरिकेच्या आरोग्य यंत्रणेने सोमवारी संध्याकाळी दिली होती.

या साथीने युरोपात आतापर्यंत १,४२,४१३ जण दगावले असून इटलीत सर्वाधिक २९,०७९ जणांचा मृत्यू झाला आहे. पण इटलीने जाहीर केले त्याहून अधिक जण या साथीने दगावल्याची माहिती ‘इटालियन नॅशनल स्टॅटिस्टीक्स’ या सरकारी गटाने दिली. इटलीचे सरकार सांगत आहे, त्यात ११,६०० अधिक बळींचा समावेश करावा. कारण इटलीच्या सरकारने बळींची संख्या लपविली आहे. इटलीच नाही तर, जगभरातील इतर देशांमध्येही कोरोनाच्या बळींची खरी संख्या दडविली जात असल्याचा आरोप या गटाने केला. याआधी स्पेनमधील गटाने आपल्या सरकारवर असाच लपवाछ्पवीचा आरोप केला होता.

जॉन हॉप्किन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनमध्ये गेल्या चोवीस तासात १३० जणांचा बळी गेला असून ब्रिटनमधील एकूण बळींची संख्या २८,७३४ वर गेली आहे. तर ब्रिटनमधील कोरोनाबाधितांची संख्या दोन लाखांजवळ पोहोचली आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासात जगभरात या साथीचे ७७,८९५ रुग्ण आढळले असून यामध्ये अमेरिकेतील ३० हजाराहून अधिक नव्या रुग्णांचा समावेश आहे. तर रशियात सलग तिसऱ्या दिवशी दहा हजार नव्या रुग्णांची भर पडली आहे. रशियात या साथीचे १,४५,२६८ रुग्ण आहेत.

leave a reply