तालिबानच्या गोळीबारात पाकिस्तानचे तीन जवान ठार

इस्लामाबाद – दोन आठवड्यांपूर्वी तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर पाकिस्तानने जल्लोष साजरा केला होता. अफगाणिस्तानात आपलीच राजवट आल्याचे दावे पाकिस्तानातून झाले होते. पण गेल्या चोवीस तासात तालिबानने पाकिस्तानला दोन मोठे झटके दिले आहेत. बजौर सीमेवर तालिबानच्या दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे तीन जवान आणि दोन नागरिक ठार झाले. तर पाकिस्तानच्या लष्कराला आव्हान देणाऱ्या ‘तेहरिक-ए-तालिबान’बरोबर पाकिस्तानने चर्चा करून वाद सोडवावा, त्यात आपण दखल देणार नसल्याचे तालिबानने म्हटले आहे. यामुळे पाकिस्तानातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून तालिबानने आपला विश्‍वासघात केल्याची टीका पाकिस्तानी करीत आहेत.

पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनख्वा प्रांतात गेल्या काही दिवसांपासून तणाव निर्माण झाल्याच्या बातम्या येत आहेत. तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून वझिरिस्तान, बजौर सीमेवर तैनात पाकिस्तानी जवानांना तालिबानचे दहशतवादी धमक्या देत आहेत. ‘अफगाणिस्ताननंतर लवकरच पाकिस्तानचा ताबा घेऊ’, अशी धमकी देणाऱ्या तालिबानच्या दहशतवाद्याचा एक व्हिडिओ समोरही आला होता. पण रविवारी बजौरच्या सीमेवर अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांनी आपल्या जवानांवर गोळीबार केल्याचे पाकिस्तानी लष्कराने जाहीर केले.

यामध्ये लष्कराचे तीन जवान ठार झाले तर दोन नागरिकांचा बळी गेल्याची माहिती पाकिस्तानी लष्कराने दिली. प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत आपणही दोन किंवा तीन दहशतवादी मारल्याचा दावा पाकिस्तानचे लष्कर करीत आहे. सीमेवरील या गोळीबाराबाबत तालिबानने प्रतिक्रिया दिलेली नाही. पण अफगाणिस्तान व पाकिस्तानला विभागणारी ड्युरंड लाईन मान्य नसल्याचे तालिबानमधील एका गटाने ठणकावले आहे.

तर तेहरिक-ए-तालिबानबाबत पाकिस्तानने केलेल्या तक्रारींचा तालिबानचा प्रवक्ता झबिहुल्ला मुजाहिद याने समाचार घेतला. पाकिस्तानचे सरकार-लष्कर यांनी तेहरिकच्या नेत्यांबरोबर चर्चा करून वाद सोडवावा. या वादात आपण दखल देणार नसल्याचे मुजाहिदने सांगितले. यामुळे तेहरिकच्या पाकिस्तानविरोधी कारवायांना तालिबानचे एकप्रकारे समर्थन असल्याची टीका पाकिस्तानातून होत आहे. काही दिवसांपूर्वी तालिबानने बागराम विमानतळावरील तुरुंगातून काही कैद्यांची सुटका केली होती. यामध्ये तेहरिक-ए-तालिबानच्या सहाशेहून अधिक दहशतवाद्यांचा समावेश होता. यावरही पाकिस्तानातून संताप व्यक्त करण्यात आला होता.

दरम्यान, तालिबानने तेहरिकची जबाबदारी झटकल्यानंतर पाकिस्तानचे लष्कर खैबर-पख्तूनख्वा प्रांतात तेहरिकच्या दहशतवाद्यांविरोधात कारवाई हाती घेऊ शकते. यामुळे अफगाण-पाकिस्तान सीमेवरील तणाव वाढू शकतो व यामध्ये तेहरिकबरोबरच तालिबानच्या दहशतवादीही मारले जाऊ शकतात. असे झाले तर पाकिस्तानचे लष्कर आणि तालिबानमध्ये संघर्ष भडकण्याची शक्यता असल्याचा दावा विश्‍लेषक करीत आहेत.

leave a reply