ट्रम्प-पॉम्पिओ यांच्या पुढाकाराने सुरू झालेली ‘वुहान लॅब थिअरी’ची चौकशी बायडेन प्रशासनाने बंद केली होती

- अमेरिकन वृत्तवाहिनीचा दावा

वॉशिंग्टन/बीजिंग – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी, कोरोनाव्हायरसचा उगम चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतच असल्यासंदर्भात चौकशी सुरू केली होती. मात्र ज्यो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पुरावे नसल्याचे कारण पुढे करून ही चौकशी बंद गुंडाळली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘सीएनएन’ या अमेरिकन वृत्तवाहिनीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. गेल्या काही दिवसात वुहानमधील ‘लॅब लीक थिअरी’चा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर ऐरणीवर आला असतानाच ही बाब समोर येणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

ट्रम्प-पॉम्पिओ यांच्या पुढाकाराने सुरू झालेली ‘वुहान लॅब थिअरी’ची चौकशी बायडेन प्रशासनाने बंद केली होती - अमेरिकन वृत्तवाहिनीचा दावाअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, 2019 साली चीनमधून सुरू झालेल्या कोरोनाच्या साथीचे मूळ वुहानमध्ये असल्याचा उल्लेख सर्वात आधी केला होता. आपल्या वक्तव्यांमधून त्यांनी सातत्याने ‘वुहान व्हायरस’चा उच्चार करीत कोरोनाच्या साथीमागे चीनच असल्याचे दावे केले होते. मात्र अमेरिकी माध्यमांनी ट्रम्प बेजबाबदार वक्तव्ये करीत असल्याचा ठपका ठेऊन जोरदार टीका केली होती. त्यानंतर ट्रम्प तसेच माजी परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी वुहान प्रयोगशाळेसंदर्भातील चौकशीचे संकेतही दिले होते.

गेल्या वर्षाच्या अखेरीस पॉम्पिओ यांनी परराष्ट्र विभागातील यंत्रणेच्या माध्यमातून ‘लॅब लीक थिअरी’च्या गोपनीय चौकशीला सुरुवात केली होती. या चौकशीत चीनच्या लष्कराचा ‘बायोवेपन्स प्रोग्राम’, वुहान लॅब व कोरोनाव्हायरस यांचा संबंध शोधण्याचे प्रयत्न सुरू होते. परराष्ट्र विभागाने कोरोनाच्या चौकशीसंदर्भातील एक ‘फॅक्ट शीट’ प्रसिद्ध केल्याचेही समोर आले होते.

ट्रम्प-पॉम्पिओ यांच्या पुढाकाराने सुरू झालेली ‘वुहान लॅब थिअरी’ची चौकशी बायडेन प्रशासनाने बंद केली होती - अमेरिकन वृत्तवाहिनीचा दावामात्र जानेवारी महिन्यात बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ट्रम्प यांचे निर्णय उलट फिरविण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यात चीनच्या विरोधातील कारवाई सौम्य करण्याचा उद्देश असल्याचे समोर आले होते. त्यानुसार, ट्रम्प व पॉम्पिओ यांच्या पुढाकाराने सुरू असलेली ‘वुहान लॅब’ची चौकशीही बंद करण्यात आली. त्यासाठी कायदेशीर चौकट, अपुरे पुरावे व स्रोतांचा चुकीचा वापर यासारखी कारणे पुढे करण्यात आली होती. चौकशी करणार्‍या पथकातील सदस्यांनी मात्र ही कारणे फेटाळून लावली आहेत.

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री व ‘सीआयए’चे माजी संचालक माईक पॉम्पिओ यांनी, कोरोनाची साथ चीनच्या प्रयोगशाळेतूनच उगम पावल्याचे वक्तव्य केले होते. त्यांनी आपल्या वक्तव्यात, परिस्थितीजन्य पुरावे व चीनच्या राजवटीकडून प्रयोगशाळेसंदर्भातील माहिती दडपण्यासाठी चाललेले जोरदार प्रयत्न या गोष्टी कोरोनाव्हायरसचा उगम चीनच्या वुहानमधील लॅबमध्येच झाल्याचे दाखवून देतात, असाही दावा केला होता.

दरम्यान, बुधवारी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांना कोरोनाचे मूळ शोधण्याच्या प्रयत्नांना अधिक वेग द्यावा व त्यासंदर्भातील अहवाल 90 दिवसात सादर करावा, असे आदेश दिले आहेत. या आदेशाने, बायडेन प्रशासनाचा दुटप्पीपणा पुन्हा एकदा समोर आला. ट्रम्प प्रशासनाचे प्रयत्न बंद पाडल्यानंतर पुन्हा त्याच धर्तीवर चौकशीचे आदेश देणे ही बाब ट्रम्प यांचेच धोरण योग्य असल्याची पुष्टी करणारी ठरते.

leave a reply