अफगाणिस्तानातून सैन्यमाघारीचा ट्रम्प यांचा निर्णय योग्यच

- अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ

सैन्यमाघारीवॉशिंग्टन – ‘दहशतवाद हा एकट्या अफगाणिस्तानातून उत्पन्न होत नाही. त्यामुळे अफगाणिस्तानात सैन्य असले म्हणजे अमेरिका सुरक्षित राहिल, असा समज करुन घेऊ नका. अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे’, असे सांगून अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या निर्णयाचे समर्थन केले. दरम्यान, ट्रम्प प्रशासन अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीचे समर्थन करीत असताना, या देशातील दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ होत असल्याचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे विरोधक निदर्शनास आणून देत आहेत.

अमेरिकेतील एका वृत्तवाहिनीशी बोलताना परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी अमेरिकेच्या सुरक्षेबाबत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भूमिका अधिक सुस्पष्ट होती, असे सांगितले. अफगाणिस्तानातून अमेरिकेच्या जवानांना सुरक्षित मायदेशी आणणे, ही देखील नियोजित मोहीम होती, असे पॉम्पिओ म्हणाले. अफगाणिस्तानात तैनात अमेरिकी सैनिकांची संख्या दोन हजारावर आणण्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी काही वर्षांपूर्वीच केली होती, याची आठवण परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी करुन दिली.

सैन्यमाघारी

‘जागतिक सुरक्षेला दहशतवादापासून मोठा धोका आहे. पण हा दहशतवाद एकट्या अफगाणिस्तानातून येत नाही’, असे सांगून पॉम्पिओ यांनी दहशतवादाचे उगमस्थान इतर ठिकाणीही असल्याचे संकेत दिले. ‘अमेरिकेच्या सुरक्षेला असलेले धोके यापुढेही समोर येतच राहतील. यासाठी अमेरिकेने आखातातील आपली भूमिका अतिशय प्रभावी केलेली आहे’, असे अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले. ट्रम्प यांच्या भूमिकेमुळेच आज आपण अमेरिकेत सुरक्षित असून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची भूमिका केवळ अफगाणिस्तानपुरती मर्यादित नाही’, असेही पॉम्पिओ म्हणाले.

सैन्यमाघारीराष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या अफगाण सैन्यमाघारीला अमेरिकेतील त्यांच्या विरोधकांकडून जोरदार विरोध होत आहे. नाटोचे प्रमुख जेम्स स्टोल्टनबर्ग यांनी देखील अमेरिकेच्या सैन्यमाघारीमुळे युरोपिय देशांची सुरक्षा अधिक धोक्यात येईल, असे स्टोल्टनबर्ग म्हणाले होते. या पार्श्‍वभूमीवर, पॉम्पिओ यांनी दहशतवाद एकट्या अफगाणिस्तानपर्यंत मर्यादित नसल्याचे स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वी जीनिव्हा येथील बैठकीतही परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीचे समर्थन केले. तसेच या देशातील शांती व सुरक्षेसाठी शेजारी या क्षेत्रातील देशांबरोबर चर्चा सुरू असल्याचे जाहीर केले होते. त्याचबरोबर कतार येथील अफगाण सरकार व तालिबानमध्ये सुरू असलेल्या चर्चेचे समर्थनही केले होते. दरम्यान, ज्यो बायडेन अमेरिकेची सूत्रे हाती घेण्याआधी अफगाणिस्तानातील अमेरिकेचे किमान दोन हजार जवान मायदेशी परतणार आहेत.

leave a reply