नाटो बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका व तुर्कीत झालेली चर्चा निष्फळ ठरल्याचे संकेत

बु्रसेल्स/वॉशिंग्टन/अंकारा – ब्रुसेल्समध्ये पार पडलेल्या ‘नाटो’ बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका व तुकीॅच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये झालेली चर्चा कोणत्याही तोडग्याविना निष्फळ ठरल्याचे संकेत मिळाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी, चर्चा सकारात्मक झाली व तुर्कीबरोबरील संबंधांमध्ये सुधारणा होतील, अशी आशा व्यक्त केली. तर तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी चर्चा सकारात्मक वातावरणात झाली, इतकीच प्रतिक्रिया दिली आहे. चर्चेनंतरच्या २४ तासात तुर्की चलन लिराचे मूल्य दोन टक्क्यांनी घसरल्याची माहिती समोर आली आहे.

सोमवारी नाटोच्या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर बायडेन व एर्दोगन यांच्यात चर्चा पार पडली. या चर्चेपूर्वी गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेच्या दोन वरिष्ठ अधिकार्‍यांनी तुर्कीला भेट दिली होती. या भेटीनंतर बायडेन व एर्दोगन यांच्या बैठकीसाठी अजेंडा जाहीर होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. तुर्कीच्या अधिकार्‍यांनीही तसे संकेत दिले होते. मात्र कोणताही अजेंडा प्रसिद्ध करण्यात आला नव्हता. त्यामुळे चर्चेत विशेष काही निष्पन्न होणार नाही, असा दावा काही माध्यमे व विश्‍लेषकांकडून आधीच करण्यात आला होता.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात एर्दोगन यांनी अमेरिकेशी बर्‍यापैकी संबंध ठेवण्यात यश मिळविले होते. मात्र सत्ताबदलानंतर अमेरिका व तुर्कीतील संबंध फारसे सख्ख्याचे राहणार नाहीत, असे संकेत मिळण्यास सुरुवात झाली होती. बायडेन प्रशासनाने तुर्कीबरोबरील संबंध सुधारण्यासाठी पुढाकार घेण्याबाबत कोणतीही पावले उचलली नव्हती. मात्र तुर्की राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी काही सकारात्मक विधाने करून अमेरिकेबरोबरील संबंध सुधारण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या.

अमेरिका व तुर्कीमध्ये सिरिया व लिबियातील संघर्ष, रशियाची ‘एस-४०० यंत्रणा’, तुर्कीकडून इराण तसेच पॅलेस्टाईनबाबत घेण्यात येणारी भूमिका तसेच एर्दोगन यांच्याकडून देशांतर्गत विरोधकांवर सुरू असणारी कारवाई, अशा अनेक मुद्यांवरून मतभेद आहेत. त्यातच तुर्कीने गेल्या वर्षीपासून भूमध्य सागरी क्षेत्रात ग्रीसविरोधात चालू केलेल्या हालचालींचीही भर पडली आहे. यातल्या कोणत्याही मुद्यावर अमेरिकेने आपली भूमिका बदलली नसल्याचे संकेत बायडेन प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. दुसर्‍या बाजूला बायडेन यांच्याबरोबर बैठक झाल्यानंतर तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी ‘एस-४००’संबंधातील धोरणात कोणताही बदल करणार नसल्याचे संकेत दिले आहेत.

या चर्चेनंतर काही तासातच तुर्की चलन लिरामध्ये तब्बल दोन टक्क्यांची घसरण झाल्याचे समोर आले. त्यामुळे चर्चा निष्फळ ठरल्याच्या संकेतांना एक प्रकारे दुजोराच मिळाल्याचा दावा विश्‍लेषकांनी केला आहे.

leave a reply