तुर्कीचे सीरियन लष्करावर नवे हल्ले

तुर्कीचे सीरियन लष्करावर नवे हल्ले

दमास्कस – तुर्की लष्कर व समर्थक बंडखोरांनी सीरियन लष्करावर नवे हल्ले चढविले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने ‘कोरोनाव्हायरस’ साथीच्या पार्श्वभूमीवर सिरियात संघर्षबंदीचे आवाहन केले असतानाही तुर्कीने हे हल्ले केले. या हल्ल्यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचा दावा सिरियातील सूत्रांनी केला आहे.

शुक्रवारी मध्यरात्री तुर्की लष्कर व बंडखोर गटाने ईशान्य सिरियातील ‘ताल तम्र’ शहरावर हल्ले चढविले. यावेळी नागरी वस्त्यांमध्येही बॉम्ब टाकण्यात आल्याचे सांगण्यात येते. ‘सना’ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीत, सिरियाच्या बाजूने कोणतीही चिथावणी देण्यात आली नव्हती असा दावा करण्यात आला आहे.

‘ताल तम्र’ शहर हे ईशान्य सिरियातील ‘अल-हसकाह’ प्रांताचा भाग असून त्यावर तुर्कीकडून सातत्याने हल्ले सुरू आहेत. हे क्षेत्र सिरियातील संघर्षाबंदी लागू असलेल्या भागात मोडत असूनही तुर्की व समर्थक बंडखोर गटांकडून सतत हल्ले करण्यात येत आहेत.

तुर्की सरकारने सिरियातील अस्साद राजवट तसेच कुर्दवंशियांना सातत्याने विरोध केला असून त्यांच्याविरोधात संघर्ष कायम ठेवण्याची धमकी वारंवार दिली आहे. या मुद्यावरून तुर्कीचे अमेरिका व रशियाशी सातत्याने खटके उडाल्याचेही यापूर्वी दिसून आले आहे.

leave a reply