संरक्षणदलांनी कोरोनाव्हायरसपासून आपले रक्षण करावे – संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत

संरक्षणदलांनी कोरोनाव्हायरसपासून आपले रक्षण करावे – संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत

नवी दिल्ली – संरक्षणदलाने स्वतःला कोरोनाव्हायरसपासून सुरक्षित राखायला हवे. आपण सुरक्षित असलो तरच जनता आणि सरकारला सहाय्य करु शकू, असा संदेश संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी दिला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी जवानांना हा सल्ला दिला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाच्या आदेशानुसार संरक्षणदल या साथीविरोधात लढा देत आहे, असेही जनरल रावत यांनी पुढे सांगितले.

देश कोरोनाव्हायरसचा सामना करीत असताना आपल्याला जबाबदारीची जाणीव असायला हवी. संरक्षणदलाच्या जवानांना या साथीची लागण झाली तर ते नागरिक आणि सरकारला सहाय्य करु शकत नाही. म्हणूनच संरक्षणदलाच्या जवानांनी या साथीपासून सुरक्षित रहायला हवे. जवानांनी मास्क आणि सोशल डिस्टसिंगचे पालन करणे बंधनकारक असल्याचे जनरल रावत यांनी सांगितले. तसेच सीमेवर तैनात असलेल्या जवानांना या साथीची लागण झालेली नसल्याचे सांगून जनरल रावत यांनी त्यावर समाधान व्यक्त केले.

संरक्षणदलांच्या बैठका देखील व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतल्या जातात. काही दिवसांपूर्वीच संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून तिन्ही दलांच्या प्रमुखांची बैठक संबोधित केली असून यावेळी संरक्षणदलाच्या सज्जतेचा आढावा घेतला. या संकटाच्या काळात ‘ मेड इन इंडिया’ला चालना देता येईल, असे जनरल रावत म्हणाले. आता कोरोनाव्हायरसच्या काळात डीआरडीओने मेड इन इंडिया उपक्रमाअंतर्गत व्हेटिंलेटर्स, मास्क, पीपीई किट्स विकसित केली, याचा जनरल बिपीन रावत यांनी विशेष उल्लेख केला. तसेच संरक्षणदलांना ही आता संरक्षण साहित्यांसाठी ‘मेड इन इंडिया’ उपक्रमावर भर द्यायला हवा. त्यासाठी आयआयटी आणि इतर उद्योगांचे सहाय्य लागेल, असे जनरल रावत यांनी म्हटले. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात जनतेने अधिर न होता संयम दाखवायला हवा, असे आवाहन जनरल रावत यांनी केले.

leave a reply