तुर्कीने रशियाचे मालवाहू जहाज ताब्यात घेतले

- युक्रेनच्या राजदूतांचा दावा

मालवाहू जहाजकिव्ह/अंकारा – तुर्कीने सुमारे सात हजार टन अन्नधान्य घेऊन जाणारे रशियाचे मालवाहू जहाज रोखले आहे. तुर्कीने रशियन जहाजाची चौकशी सुरू केल्याचा दावा युक्रेनच्या राजदूतांनी केला. दरम्यान, युक्रेनच्या सांगण्यावरुन तुर्कीने ही कारवाई केल्याचे उघड होत आहे. काही दिवसांपूर्वी तुर्कीने रशियाचे हे जहाज ताब्यात घ्यावे, अशी मागणी युक्रेनने केली होती.

रशिया व युक्रेन हे दोन्ही देश गहू आणि कडधान्याचे मोठे निर्यातदार देश आहेत. पण युद्ध सुरू झाल्यापासून रशिया व युक्रेन अन्नधान्याची निर्यात करू शकलेले नाहीत. याचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असून जगभरात अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली आहे. अमेरिका व पाश्चिमात्य देश यासाठी रशियाला जबाबदार धरत आहेत. रशियाने मात्र आपल्यावरील हे आरोप फेटाळले आहेत. पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांमुळे रशिया अन्नधान्याची निर्यात करू शकत नाही, असे रशियाचे म्हणणे आहे.

मालवाहू जहाजतर युक्रेनने रशियावर आपल्या अन्नधान्याची कोंडी केल्याचा ठपका ठेवला आहे. रशियाने युद्ध पुकारल्यामुळे जवळपास अडीच कोटी टन धान्य युक्रेनच्या बंदरात अडकून पडल्याचा दावा केला जातो. यापैकी बराच धान्यसाठा रशियाच्या ताब्यात असलेल्या बंदरात असल्याचा आरोप युक्रेन करीत आहे. यापैकी सात टन धान्याची रशिया तस्करी करीत असल्याची बोंब युक्रेनने ठोकली आहे.

गेल्या आठवड्यात ‘झिबेक झॉली’ हे जहाज युक्रेनच्या बर्डियान्स्क बंदरातून हजारो टन कडधान्य घेऊन निघाले. कझाकस्तानच्या ‘केटीझेड एक्स्प्रेस’ची मालकी असलेल्या या जहाजाच्या वाहतुकीचे नियंत्रण रशियाच्या ‘ग्रीन लाईन’ या कंपनीकडे आहे. सदर जहाज शनिवारी तुर्कीच्या करासू बंदरात दाखल झाले. त्यानंतर तुर्कीतील युक्रेनचे राजदूत वॅसिली बोद्नार यांनी तुर्कीने सदर जहाज ताब्यात घ्यावे, अशी मागणी केली होती.

मालवाहू जहाजतुर्कीने यावर प्रतिक्रिया दिली नव्हती. पण राजदूत बोद्नार यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुर्कीने रशियाचे जहाज ताब्यात घेतले आहे. तसेच या जहाजावरील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केल्याचे युक्रेनच्या राजदूतांचे म्हणणे आहे. तुर्कीने याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. पण अन्नधान्याची तस्करी करणाऱ्या जहाजांना आपल्या बंदरात प्रवेश दिला जाणार नाही. या जहाजांविरोधात कारवाई केली जाईल, अशी घोषणा तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी केली होती.

दरम्यान, तुर्कीने रशियाविरोधात भूमिका घ्यावी, यासाठी अमेरिका व पाश्चिमात्य देशांकडून दबाव टाकला जात असल्याचे तुर्कीच्या माध्यमांचे म्हणणे आहे. या दबावामुळे गेल्या आठवड्यात तुर्कीने नाटोच्या बैठकीत स्वीडन व फिनलंडमधील समावेशाला परवानगी दिल्याचा दावा माध्यमे करीत आहेत.

पाश्चिमात्यांचा दबाव अथवा आपले हितसंबंध सुरक्षित राखण्यासाठी तुर्की रशियाच्या विरोधात भूमिका स्वीकारत असल्याचे दिसू लागले आहे. सिरियामध्ये तुर्कीने केलेल्या लष्करी कारवाईविरोधात रशियाने तुर्कीला सज्जड इशारा दिला होता.

leave a reply