पाकिस्तानात भीषण रक्तपात घडविण्याची ‘तेहरिक’ची धमकी

भीषण रक्तपातकाबुल/इस्लामाबाद – आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर पाकिस्तानात भीषण रक्तपात घडविण्याची धमकी ‘तेहरिक-ए-तालिबान’ने दिली होती. आपले प्राबल्य असलेल्या अफगाणी सीमेनजिकच्या पाकिस्तानच्या भूभागात आपल्याला मान्य असलेले कायदे लागू करणे, ही तेहरिकची पहिली मागणी आहे. तसेच ‘फेडरली ॲडमिनिस्ट्रेटेड ट्रायबल एरिया-फाटा’ या प्रांताचे ‘खैबर पख्तूनख्वा’मध्ये केलेले विलिनीकरण रद्द करा, ही मागणी तेहरिकने उचलून धरली आहे. पाकिस्तानच्या संसदेला आव्हान देणाऱ्या या दोन्ही मागण्या मान्य करणे शक्य नसल्याचे पाकिस्तानच्या सरकारचे म्हणणे आहे. पण तेहरिकने दिलेल्या धमकीनंतर, पाकिस्तानी संसदेने तेहरिकशी वाटाघाटी करण्याचे सर्वाधिकार लष्कराला बहाल केले आहेत.

तालिबानची पाकिस्तानातील शाखा मानल्या जाणाऱ्या ‘तेहरिक-ए-तालिबान’ने गेल्या महिन्यात पाकिस्तानसमोर आपल्या मागण्या ठेवल्या होत्या. यामध्ये उत्तर व दक्षिण वझिरिस्तान, कुर्राम तसेच ओराकझाई आणि खैबर या पश्तू बहुसंख्य प्रांतांना ‘खैबर-पख्तूनख्वा’तून वगळण्याची मागणी तेहरिकने केली होती. तसेच या भागात पाकिस्तानचे कायदे किंवा नियम लागू होणार नाहीत. पाकिस्तानी लष्कर किंवा सुरक्षा यंत्रणेचा अधिकारी बंदूक घेऊन गस्त घालणार नाही, अशा मागण्या तेहरिकने केल्या होत्या.

भीषण रक्तपातपाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’चे माजी प्रमुख आणि सध्या पेशावर लष्करी कमांडचे प्रमुख जनरल फैझ हमीद यांनी तेहरिकबरोबरील या चर्चेचे नेतृत्व केले होते. पण पाकिस्तानच्या सरकारचे प्रतिनिधी म्हणून जनरल हमीद तेहरिकशी वाटाघाटी करण्यात अपयशी ठरले होते. यानंतर आक्रमक झालेल्या तेहरिकने पाकिस्तानला धमकावले. आपल्या मागण्या मान्य केल्या नाही तर पाकिस्तानात रक्तपात घडविण्याची धमकी तेहरिकने दिली होती.

यामुळे चिंतेत पडलेल्या पाकिस्तानच्या सरकारने तेहरिकबरोबरील चर्चेसाठी लष्कराच्या नेतृत्वाला परवानगी दिली आहे. यानुसार येत्या काही तासात पाकिस्तानी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आणि तेहरिकमध्ये चर्चा होणार आहे. पण लष्कराच्या नेतृत्वाने तेहरिकबरोबर वाटाघाटी करताना पाकिस्तानच्या राजकीय घटनेला धक्का लागणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणी केली आहे. पाकिस्तानी लष्कराने तेहरिकची मागणी मान्य करून खैबर-पख्तूनख्वामधून पश्तूंची बहुसंख्या असलेल्या भागाचे विभाजन करणे चुकीचे ठरेल, याची जाणीव संसदेला करून दिली आहे.

दरम्यान, तेहरिक आणि पाकिस्तानच्या लष्करात वाटाघाटी सुरू होण्याच्या मार्गावर असताना, उत्तर वझिरिस्तान प्रांतात पाकिस्तानी लष्करावर हल्ला झाल्याच्या बातम्या येत आहेत. दहशतवाद्यांनी लष्कराच्या गस्ती वाहनावर आत्मघाती हल्ला चढविला असून यात मोठ्या प्रमाणात जवान ठार झाल्याचा दावा केला जातो. गेल्या वर्षी तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून पाकिस्तानातील तेहरिकच्या कारवायांमध्ये फार मोठी वाढ झालेली आहे.

leave a reply