तुर्कीचे भूमध्य समुद्रातील धोरण शत्रूसमान आहे

- फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन

भूमध्यपॅरिस – इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल अल-सिसी फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्याबरोबर चर्चा पार पडली. राष्ट्राध्यक्ष सिसी यांच्या या दौऱ्याच्या आधी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी तुर्कीच्या भूमध्य सागराबाबतच्या धोरणावर सडकून टीका केली होती. या क्षेत्राबाबतचे तुर्कीचे धोरण एखाद्या शत्रूदेशासारखेच असल्याचा टोला राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी लगावला होता. राष्ट्राध्यक्ष सिसी यांच्या या दौऱ्यात, भूमध्य सागरी क्षेत्रात स्थैर्य निर्माण करण्यासाठी फ्रान्स व इजिप्त संयुक्तरित्या प्रयत्न करणार असल्याची ग्वाही उभय नेत्यांनी दिली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून भूमध्य सागरी क्षेत्रात तणाव निर्माण झाला आहे. तुर्कीने सायप्रसच्या सागरी क्षेत्रात इंधन उत्खनन सुरू केले होते. तर ग्रीसच्या सागरी क्षेत्रात नौदलाची जहाजे रवाना केली होती. भूमध्य समुद्रातील तुर्कीच्या या अरेरावीला फ्रान्ससह इजिप्तने ताशेरे ओढले होते. नाटोचा सदस्यदेश असलेल्या तुर्कीने ग्रीस, सायप्रस या सदस्य देशांविरोधात भूमिका स्वीकारू नये, असे आवाहन नाटोकडून करण्यात आले होते. तरीही तुर्कीच्या भूमिकेत फरक पडलेला नाही.

भूमध्य

भूमध्य समुद्रात नुकत्याच पार पडलेल्या युद्धसरावातही तुर्कीच्या विनाशिकेने अडथळे आणण्याचा प्रयत्न केला होता. पण या सरावात सहभागी झालेल्या इजिप्तच्या विनाशिकेने तुर्कीच्या विनाशिकेला पिटाळून लावले आहे. फ्रान्ससह ग्रीसने इजिप्तच्या या कारवाईचे स्वागत केले आहे. तर भूमध्य समुद्रातील तुर्कीने स्वीकारलेल्या या धोरणांवर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी कोरडे ओढले.

तुर्कीचे धोरण शत्रूसमान असल्याची घणाघाती टीका राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी केली. त्याचबरोबर तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी आपल्या जनतेच्या मानवाधिकारांचा आदर करावा, असा हल्ला राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी चढविला. तुर्कीवर ही टीका करीत असताना फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष सिसी यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली. सोमवारी सिसी यांची भेट घेतल्यानंतर फ्रान्स इजिप्तला बिनशर्त लष्करी सहाय्य देणार असल्याचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी जाहीर केले. फ्रान्सच्या या भूमिकेवर तुर्कीकडून तीव्र प्रतिक्रिया अपेक्षित आहे.

leave a reply