तुर्कीच्या अर्थमंत्र्यांकडून डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याचे संकेत

इस्तंबूल – तुर्कीच्या अर्थव्यवस्थेतील अमेरिकी डॉलरचे अवलंबित्व कमी करण्याच्या प्रक्रियेला अधिक वेग देण्यात येईल, असे संकेत देशाचे अर्थमंत्री नुरेद्दिन नेबाती यांनी दिले. गेल्या महिन्यात तुर्की सरकारने परदेशी चलनांमधील ठेवी स्थानिक चलन लिरामध्ये रुपांतरित करण्यासाठी विशेष योजना सुरू केली होती. त्याला यश मिळाल्याचा दावा करीत अर्थमंत्री नुरेद्दिन नेबाती यांनी डॉलरचे प्रमाण कमी करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. गेल्या वर्षी रशियाच्या मध्यवर्ती बँकेने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात, जगभरातील आघाडीचे देश डॉलरचा साठा कमी करण्यासाठी हालचाली करीत असल्याकडे लक्ष वेधले होते.

तुर्कीच्या अर्थमंत्र्यांकडून डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याचे संकेतगेल्या वर्षभरात तुर्कीचे चलन लिराचे मूल्य अमेरिकी डॉलरच्या तुलनेत जवळपास ५० टक्क्यांनी घसरले आहे. एकट्या डिसेंबर महिन्यात लिराची घसरण रोखण्यासाठी तुर्कीच्या मध्यवर्ती बँकेला पाचवेळा हस्तक्षेप करावा लागला होता. या हस्तक्षेपाच्या प्रक्रियेत मध्यवर्ती बँकेेने सहा ते १० अब्ज डॉलर्सची विक्री केली असावी, असे सांगण्यात येते. या विक्रीनंतर तुर्कीतील परकीय गंगाजळी आठ अब्ज डॉलर्सपर्यंत खाली घसरली आहे.

तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांच्या धोरणांमुळे तुर्कीच्या जनतेत नाराजी असून चलन लिरावरील विश्‍वासही कमी झाला आहे. त्यामुळे तुर्की जनतेकडून मोठ्या प्रमाणावर परकीय चलनाचा वापर वाढला होता. त्याचा परिणाम लिराचे मूल्य घसरण्यात झाला आहे. हे रोखण्यासाठी तुर्की सरकारने गेल्या महिन्यात नवी योजना सादर केली होती. त्यात परदेशी चलनात असलेला निधी लिरामध्ये रुपांतरित करून सुरक्षित ठेवण्याची तरतूद आहे.

तुर्कीच्या अर्थमंत्र्यांकडून डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याचे संकेतया योजनेअंतर्गत तुर्कीच्या नागरिकांनी जवळपास ९.६९ अब्ज डॉलर्सचा निधी डिपॉझिट केल्याची माहिती तुर्कीचे अर्थमंत्री नेबाती यांनी दिली. सरकारी योजनेला मिळालेल्या या प्रतिसादाचा उल्लेख करून नेबाती यांनी, अमेरिकी डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याची प्रक्रिया अधिक वेगाने चालविण्यात येईल, असे बजावले. परदेशी चलनात निधी ठेवण्याचे प्रमाण घटले असून हाच कल कायम राहिल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्या धोरणांमुळे लिराची घसरण होत असून महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. यामुळे एर्दोगन यांची लोकप्रियता घसरणीस लागली असून, तुर्कीतील आर्थिक संकटामागे परकीय हस्तक्षेप असल्याचा दावा एर्दोगन करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याच्या प्रक्रियेला वेग देण्याची घोषणा लक्ष वेधून घेणारी ठरते.

leave a reply