इराकमधील अमेरिकेच्या ठिकाणांवर 12 तासात दोन हल्ले

बगदाद – अमेरिका आणि इराकमधील इराणसंलग्न दहशतवादी संघटनांमधील संघर्ष वाढू लागला आहे. गेल्या चोवीस तासात इराणसंलग्न दहशतवाद्यांनी इराकमधील अमेरिकेच्या हवाईतळ आणि दूतावासावर हल्ले चढविले. गेल्या महिन्यात अमेरिकेने इराक व सिरियातील इराणसंलग्न गटांवर केलेल्या कारवाईचा सूड म्हणून हे हल्ले चढविले असून येत्या काळात यांचे प्रमाण वाढेल, अशी धमकी या गटांनी दिली. दरम्यान, अमेरिकी हितसंबंधांवर ड्रोन हल्ले चढविणार्‍यांची माहिती देणार्‍यांना तीस लाख डॉलर्स ईनाम देण्याची घोषणा अमेरिकेने केली आहे.

इराकमधीलअमेरिका आणि मित्रदेशांचे लष्कर तैनात असलेल्या इराकमधील एन अल-असाद हवाईतळावर सोमवारी दुपारी रॉकेट हल्ले झाले. एकूण सात रॉकेट्चा मारा या हवाईतळाच्या दिशेने करण्यात आला होता. पण यातील तीन रॉकेट्स हवाईतळाच्या आवारात कोसळले. यानंतर सोमवारी मध्यरात्रीनंतर राजधानी बगदाद येथील अमेरिकेच्या दूतावासावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला.

स्फोटकांनी भरलेले ड्रोन दूतावासाच्या इमारतीवर आदळविण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. पण अमेरिकेच्या लष्कराने हवाई सुरक्षा यंत्रणेचा वापर करून रॉकेटद्वारे हे ड्रोन नष्ट केले. यामुळे मोठा घातपात टळला. या दोन्ही हल्ल्यांमध्ये कुठलीही हानी झाली नसल्याचे अमेरिकेने जाहीर केले. तसेच या दोन्ही हल्ल्यांच्या सूत्रधारांचा तपास सुरू असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले. या दोन्ही हल्ल्यांच्या आधी व नंतर इराकमधील ‘कतैब हिजबुल्लाह’ तसेच ‘हरकत हिजबुल्लाह अल-नुजाबा’ आणि ‘कतैब सईद अल-सुहादा’ या तीन इराणसंलग्न दहशतवादी संघटनांनी अमेरिकेला धमक्या दिल्या आहेत.

इराकमधीलगेल्या महिन्यात अमेरिकेने इराक आणि सिरियातील इराणसंलग्न दहशतवादी संघटनांवर मोठी हवाई कारवाई केली होती. यामध्ये इराणसंलग्न दहशतवादी संघटनांना मोठी जीवितहानी सोसावी लागल्याचा दावा केला जातो. अमेरिकेच्या या हल्ल्याचा सूड घेऊ अशी धमकी या दहशतवादी संघटनांनी दिली होती. अमेरिकेने इराकमधून माघार न घेतल्यास अमेरिकेला भयंकर परिणाम सहन करावे लागतील असे या इराणसंलग्न दहशतवादी संघटनांनी बजावले होते.

इराकमधीलहवाईतळ व दूतावासावरील या हल्ल्यावर अमेरिकेकडून प्रतिक्रिया अपेक्षित आहे. इराकमधील ‘पॉप्युलर मोबिलाईझेशन फोर्सेस’ या इराणशी संलग्न असलेल्या प्रभावी दहशतवादी संघटनेने अमेरिकेच्या या हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी हालचाली वाढविल्याच्या बातम्या येत आहेत. अमेरिकेने देखील या हल्ल्यांमागे असलेल्यांची माहिती देणार्‍यांना तीस लाख डॉलर्सचे ईनाम घोषित केले आहे.

या वर्षाच्या सुरुवातीपासून इराकमधील अमेरिकेच्या ठिकाणांवर किमान 47 हल्ले झाल्याचा दावा केला जातो. यामध्ये सहा ड्रोन हल्ल्यांचा समावेश आहे. एप्रिल, मे आणि जून महिन्यात अरबिल, अल-असाद आणि बगदाद येथील तळांवर तैनात अमेरिकी लष्कराला लक्ष्य करण्यासाठी ड्रोन हल्ले झाले होते. अजूनही इराकमध्ये अमेरिकेचे सुमारे अडीच हजार जवान तैनात आहेत.

leave a reply