पंतप्रधानांकडून दलाई लामा यांना शुभेच्छा

- याद्वारे भारताने चीनला संदेश दिल्याचा विश्‍लेषकांचा दावा

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलाई लामा यांना त्यांच्या 86 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दलाई लामा यांना पंतप्रधानांनी फोन करून दिलेल्या या शुभेच्छांचा भारत आणि चीनमधील तणावाशी संबंध जोडण्यात येत आहे. तिबेटी बौद्धधर्मियांचे सर्वोच्च नेते मानले जाणार्‍या दलाई लामा यांच्याबाबत जगभरात आदर व सन्माची भावना आहे. मात्र सात दशकांपूर्वी तिबेटचा अवैधरित्या कब्जा घेणार्‍या चीनला दलाई लामा यांचा साधा उल्लेखही सहन होत नाही. यामुळे भारताच्या पंतप्रधानांनी दलाई लामा यांच्याबरोबर फोनवर चर्चा करून चीनला संदेश दिल्याचे दावे केले जातात. आपण निर्वासित म्हणून भारतात आलो आणि इथेच स्थायिक झालो, भारताचे स्वातंत्र्य व धार्मिक सहिष्णुतेचा आपण पुरेपूर लाभ घेतला, असे सांगून दलाई लामा यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

पंतप्रधानांकडून दलाई लामा यांना शुभेच्छा - याद्वारे भारताने चीनला संदेश दिल्याचा विश्‍लेषकांचा दावा1950 साली चीनने लष्कर घुसवून तिबेटचा ताबा घेतला होता. चीनपासून असलेल्या धोक्यामुळे 1959 साली दलाई लामा यांना तिबेट सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला. त्यांच्यासह कित्येक तिबेटींनी भारतात आश्रय घेतला. भारतात राहून चीनच्या तिबेटवरील आक्रमण आणि तिबेटींवरील अत्याचारांना वाचा फोडण्याचे काम दलाई लामा समर्थपणे करीत आले आहेत. यावर चीनने वेळोवेळी आक्षेप नोंदविला होता. दलाई लामा तिबेटच्या फुटीरतेसाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगून चीनने या प्रकरणी भारतावर दडपण टाकण्याचे शक्य तितके प्रयत्न करून पाहिले. मात्र दलाई लामा हे भारतीयांसाठी आदरणीय ठरतात, असे सांगून भारताने चीनचे आक्षेप धुडकावले होते.

या पार्श्‍वभूमीवर, पंतप्रधान मोदी यांनी दलाई लामा यांना फोन करून 86 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दलाई लामा यांना प्रदिर्घ आणि आरोग्यदायी आयुष्य लाभो अशी सदिच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली. तर आपण भारताचे स्वातंत्र्य, धार्मिक सहिष्णूता यांचा पुरेपूर लाभ घेतल्याचे दलाई लामा यांनी म्हटले आहे. भारताच्या धर्मनिरपेक्षतेचा व भारताचा प्रमाणिकपणा, करुणा व अहिंसा या मुल्यांचा आपण आदर करतो, असेही दलाई लामा पुढे म्हणाले. पंतप्रधान मोदी यांची दलाई लामांबरोबरील फोनवरील चर्चा भारत व चीन संबंधांशी जोडली जात असून याद्वारे भारताने चीनला इशारा दिल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

चीनवर हुकूमशाही गाजविणार्‍या कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेला गेल्या आठवड्यात शंभर वर्षे पूर्ण झाली. याच्या शुभेच्छा पंतप्रधान मोदी यांनी चीनला दिल्या नव्हत्या. याचे तिबेटींनी स्वागत केले होते. या पार्श्‍वभूमीवर, पंतप्रधानांची दलाई लामा यांच्याबरोबरील चर्चा लक्षवेधी ठरते. आत्ताच्या काळात चीन आपल्या झिंजियांग प्रांतातील उघूरवंशियांवर करीत अललेल्या अत्याचारांचा मुद्दा जगात गाजत आहे. हाँगकाँगमधील लोकशाहीवादी चळवळ चिरडण्यासाठी चीन करीत असलेल्या दडपशाहीवर आंतरराष्ट्रीय समुदायाकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. त्याचवेळी तिबेटी जनतेच्या चीन करीत असलेल्या गळचेपीचा मुद्दा देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित केला जात आहे. अशा परिस्थितीत दलाई लामा यांच्याबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्या चीनला अस्वस्थ करणार्‍या ठरू शकतील.

leave a reply