वायुसेनेच्या जम्मूमधील तळावर दोन स्फोट

– ड्रोन हल्ल्याद्वारे पाकिस्ताननेच स्फोट घडविल्याचा आरोप
– ही युद्धाची घोषणा असल्याचा माजी लष्करी अधिकार्‍यांचा इशारा

जम्मू – रविवारची पहाट होण्याआधी जम्मूमधील वायुसेनेच्या तळावर दोन स्फोट झाले. हे स्फोट कमी तीव्रतेचे होते व यात वायुसेनेच्या तळाची फारशी हानी झालेली नाही. मात्र यासाठी ड्रोन्सचा वापर झाला व हा देशाच्या संरक्षणदलांवर झालेला पहिला ड्रोन हल्ला ठरतो. याची गंभीर दखल घेतली जात आहे. लडाखच्या भेटीवर असलेल्या संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी वायुसेनेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करून इथल्या सुरक्षेचा आढावा घेतला. या घातपातामागे पाकिस्तान व पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना असल्याची खात्री सामरिक विश्‍लेषकांना पटलेली आहे. वायुसेनेच्या तळावरचा हा हल्ला म्हणजे युद्धाची घोषणाच ठरते, असा इशारा माजी लष्करी अधिकारी देत आहेत. पाकिस्तानच्या या आगळिकीला प्रत्युत्तर दिल्याखेरीज भारतासमोर पर्याय नाही, याचीही जाणीव माजी लष्करी अधिकारी व विश्‍लेषक करून देत आहेत.

दोन ड्रोन्सचा वापर करून घडविण्यात आलेल्या या दोन स्फोटात वायुसेनेचे दोन कर्मचारी जखमी झाले असून एकमजली इमारतीच्या छताने नुकसान झाले. फारशी हानी झालेली नसली तरी हा स्फोट सुरक्षा यंत्रणांना मिळालेली फार मोठी इशाराघंटा असल्याचे स्पष्ट होत आहे. आंतरराष्ट्रीय सीमा व नियंत्रण रेषेवरील हवाई सुरक्षा यंत्रणा कमी उंचीवरून उडणार्‍या व कमी वजनाच्या ड्रोन्सचा वेध घेऊ शकत नाहीत. त्याचा फायदा घेऊन पाकिस्तान जम्मू-काश्मीर व पंजाबमध्ये ड्रोन्सद्वारे शस्त्रे आणि अमली पदार्थांची तस्करी करीत आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पाकिस्तान अशारितीने घातपात घडविण्याची तयारी करीत आहे. याची दखल भारतीय यंत्रणांनीही घेतली होती. भारत ड्रोनभेदी यंत्रणा खरेदी करण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. मात्र त्याआधीच हा घातपात घडविण्यात आला याकडे माजी लष्करी अधिकारी लक्ष वेधत आहेत.

वायुसेनेच्या जम्मूमधील तळावर दोन स्फोटपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू व काश्मीरमधील राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली होती. या भेटीत सध्या केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा देण्याची घोषणा करण्यात आली. यामुळे पाकिस्तानची घोर निराशा झाली असून त्या वैफल्यातून पाकिस्तानने हा घातपात घडविला, असा आरोप भारतीय माध्यमे करीत आहेत. तसेच हा हल्ला वायुसेनेच्या तळावर करण्यात आला व इथे तैनात असलेली हेलिकॉप्टर्स या हल्ल्याच्या निशाण्यावर होती, याची जाणीव विश्‍लेषक करून देत आहेत. याला भारताने प्रत्युत्तर दिले नाही, तर पुढच्या काळात अशा हल्ल्यांची मालिका सुरू होईल, असे सामरिक विश्‍लेषक बजावत आहेत.

या हल्ल्यानंतर वायुसेना व लष्कराच्या इतर तळांवरील सुरक्षा कडेकोट करण्यात आली आहे. या घातपाताची बातमी येत असतानाच, जम्मूच्या बेनिहाल इलाक्यातून ‘लश्कर-ए-तोयबा’च्या एका दहशतवाद्याला सहा किलो ‘आईडी’ स्फोटकांसह अटक करण्यात आल्याची माहिती जम्मू आणि काश्मीरच्या पोलीस महासंचालकांनी दिली. या अटकेमुळे गर्दीच्या ठिकाणी याचा स्फोट घडविण्याचे भयंकर कारस्थान उधळले गेले. या दहशतवाद्याच्या अटकेमुळे पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटना जम्मू आणि काश्मीरमध्ये घातपात घडविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असल्याचे उघड होत आहे.

पाच दिवसांपूर्वीच संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर संघर्षबंदी झालेली असली, तरी पाकिस्तानच्या कुरापती थांबलेल्या नाहीत, असा इशारा दिला होता. पाकिस्तान ड्रोन्सचा वापर करून भारताच्या सीमेत शस्त्रास्त्रे व अमली पदार्थांची तस्करी करीत आहे. त्यामुळे पाकिस्तानबरोबरील संघर्षबंदीला फारसा अर्थ राहत नाही, असे जनरल रावत म्हणाले होते. त्यांचा हा इशारा प्रत्यक्षात उतरला असून नियंत्रण रेषेवरची संघर्षबंदी म्हणजे पाकिस्तानच्या डावपेचाचा भाग असल्याचे संकेत मिळत आहेत. नेहमीप्रमाणे पाकिस्तान या घातपाताची जबाबदारी टाळणार असून यासाठी उलट भारतावरच आरोप करण्याची तयारी पाकिस्तानच्या नेत्यांनी फार आधीच करून ठेवली होती. भारत स्वतःच दहशतवादी हल्ले घडवून त्याचे खापर पाकिस्तानवर फोडेल आणि पाकिस्तानवर हल्ला चढविल, असा कांगावा पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आधीपासूनच सुरू केलेला आहे.

दरम्यान, वायुसेनेच्या तळावरील या हल्ल्यानंतर पाकिस्तानने आपल्या सुरक्षेत वाढ केल्याच्या बातम्या येत आहेत. भारत व पाकिस्तान अघोषित पातळीवर वाटाघाटी करीत असताना, एखादा दहशतवादी गट ही चर्चा उधळण्यासाठी घातपात घडवून आणू शकतो, असा दावा पाकिस्तानचे पत्रकार करीत आहेत. भारतीय वृत्तवाहिन्यांशी बोलताना पाकिस्तानी पत्रकारांनी हा दावा केला. मात्र दहशतवादी संघटनांवर याची जबाबदारी टाकून पाकिस्तान यावेळी आपला बचाव करून घेऊ शकत नाही. कारण भारतात दहशतवादी हल्ला झाला आणि त्याचे धागेदोरे पाकिस्तानात असल्याचे आढळले, तर भारत पाकिस्तानला अद्दल घडविल्यावाचून राहणार नाही, असे संरक्षणमंत्री, संरक्षणदलप्रमुख व लष्करप्रमुखांनी वेळोवेळी बजावले होते.

leave a reply