पुंछमध्ये चकमकीत आणखी दोन जवान शहीद

- दोन पोलिसांच्या हत्येत सामील ‘लश्कर’च्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यासह तीन ठार

दहशतवाद्यांकडून आणखी दोन निष्पाप नागरिकांची हत्या
श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये नर खासच्या जंगलात दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या ऑपरेशन दरम्यान आणखी दोन जवान शहीद झाले. शुक्रवारीच एका अधिकार्‍यासह दोन जणांना या मोहिमेदरम्यान वीरमरण आले होते. त्यामुळे नर खासच्या जंगलात ऑपरेशनदरम्यान आतापर्यंत चार जवान शहीद झाले आहेत. पाच दिवसांपूर्वीच पुंछच्या जंगलात शोधमोहिमेदरम्यान पाच जवान शहीद झाले होते. त्यामुळे सहा दिवसात पुंछमधील ऑपरेशनमध्ये लष्कराच्या नऊ जवानांना वीरमरण आले आहे. दुसर्‍या बाजूला जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात जोरदार मोहिम सुरू आहे. विविध भागात चकमकी सुरू आहेत. शनिवारी पंपोरमधील चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. यामध्ये टॉप १० दहशतवाद्यांच्या यादीत सामील ‘लश्कर’च्या दहशतवाद्याचा समावेश आहे. तसेच निष्पाप नागरिकांच्या हत्येचे सत्रही थांबले नसून शनिवारी आणखी दोन नागरिकांची दहशतवाद्यांनी हत्या केल्याचे वृत्त आहे.

पुंछमध्ये चकमकीत आणखी दोन जवान शहीद - दोन पोलिसांच्या हत्येत सामील ‘लश्कर’च्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यासह तीन ठार११ ऑक्टोबरला पुंछच्या मेंढर उपविभागात येणार्‍या भिम्बर गलीजवळ एका गावात शोध मोहिमेसाठी निघालेल्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये पाच जवान शहीद झाले. त्यानंतर या संपूर्ण भागात शोध मोहीम हाती घेण्यात आली. या शोध मोहिमेदरम्यान नर खासच्या जंगलात दहशतवादी आणि सुरक्षादलाच्या जवानाच्या एका पथकामध्ये शुक्रवारी चकमक उडाली यामध्ये ज्युनिअर कमिशन्ड ऑफीसरसह (जेसीओ) एक जवान शहीद झाला होता.

तर शनिवारी या जंगलात आणखी एका जेसीओसह एका जवानाचे पार्थिव सापडले आहे. यातील एक जवान शुक्रवारी चकमकीदरम्यान जखमी झाला होता. त्यानंतर बेपत्ता होता, अशी माहिती मिळत आहे. या दोन जवानांचा आणि दहशतवाद्यांचा पुन्हा आमनासामना झाला का, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र दोन जवानांच्या वीरमरणानंतर पुंछमध्ये गेल्या सहा दिवसात मोहिमेदरम्यान नऊ जवान शहीद झाले आहेत. नायक हरेंद्र सिंह आणि सुबेदार अजय सिंह अशी शहीद झालेल्या दोन जवानांची नावे आहेत. हा दुर्गम आणि घनदाट जंगलाने वेढलेला भाग असून येथे लपून बसलेल्या दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी लष्कर आणि जम्मू-पोलिसांची संयुक्त पथके शोधमोहिम राबवत आहेत.

दुसरीकडे पुलवामा जिल्ह्यातील पंपोरमध्ये सुरक्षादलांनी चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार केले. हे तीनही दहशतवादी लश्कर-ए-तोयबाशी संबंधीत होते. यातील उमर मुश्ताक खानडेचा समावेश पहिल्या दहा मोस्ट वॉंटेड दहशतवाद्यांमध्ये होता. काही महिनांपूर्वी रस्त्याच्या कडेला चहा पिण्यासाठी उभ्या असलेल्या जम्मू-काश्मीरच्या दोन पोलिसांवर मागून येऊन गोळीबार केला होता. यामध्ये हे दोन जवान शहीद झाले होते. या हत्येमध्ये उमरचा हात होता. उमरबरोबर त्याचे दोन साथीदारही ठार झाले आहेत. त्यामुळे गेल्या सात दिवसात नऊ चकमकींमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या १४ वर पोहोचली आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा १९९० च्या दशकासारखे अराजक वातावरण निर्माण व्हावे, बाहेरून येथे नागरिकांनी कामासाठी येऊ नये यासाठी परराज्यातून येणार्‍या मजूरांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केले जात आहे. गेल्या आठवड्यात सात सामान्य निष्पाप नागरिकांच्या हत्या दहशतवाद्यांनी केल्या होत्या. तर शनिवारीही दोन जणांच्या हत्या दहशतवाद्यांनी केल्या आहेत. यातील एक जण रस्त्यालगतच पाणीपुरी विकणार्‍या मूळच्या बिहारमधील नागरिकाचा समावेश आहे. अरविंद कुमार असे त्याचे नाव आहे. श्रीनगरमध्ये त्याची हत्या करण्यात आली. तर पुलवामात सगीर अहमद या एका मजूराची हत्याही दहशतवाद्यांनी गोळी मारून केली. अहमद हा मूळचा उत्तरप्रदेशमधील आहे.

leave a reply