युएई सुदानमध्ये चार अब्ज डॉलर्सचे रेड सी बंदर उभारणार

कैरो – ‘रेड सी’सारख्या महत्त्वाच्या सागरी क्षेत्राजवळ असलेल्या सुदानमध्ये युएई सहा अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. यापैकी तब्बल चार अब्ज डॉलर्सचा वापर युएई रेड सी बंदर उभारण्यासाठी करणार आहे. दुबईतील ‘जबेल अली’प्रमाणे युएई रेड सी बंदराचा विकास करणार आहे. यामुळे येत्या काळात सदर बंदर रेड सीच्या क्षेत्रातील मुख्य व्यापारी केंद्र ठरेल, असा दावा केला जातो. युएईची सुदानमधील ही आत्तापर्यंतची मोठी गुंतवणूक ठरते.

आखाती देश आणि युरोपला व्यापारीदृष्ट्या जोडणारा महत्त्वाचा चिंचोळा सागरी मार्ग म्हणून ‘रेड सी’ला ओळखले जाते. जगातील सर्वात व्यस्त सागरी मार्गांमध्ये रेड सीचा समावेश केला जातो. हिंदी महासागर आणि भूमध्य सागराला जोडणाऱ्या ‘रेड सी’मधून जागतिक व्यापाराच्या 12 टक्के मालाची वाहतूक होते. वर्षाकाठी 19 हजार व्यापारी जहाजांमधून एक ट्रिलियन डॉलर्स इतक्या मालाची वाहतूक होत असल्याची माहिती गेल्या वर्षी प्रसिद्ध झाली होती.

अशा या महत्त्वाच्या रेड सी क्षेत्रात अत्याधुनिक बंदर उभारण्यासाठी युएईने वेगाने पावले उचलली आहेत. युएईने सुदानबरोबर सहा अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूकीसंदर्भात सामंजस्य करार केला आहे. युएईतील ‘डीएएल ग्रुप’चे अध्यक्ष ओसामा दाऊद अब्देललतिफ यांनी ही माहिती दिली. याद्वारे युएई सुदानला मदत देखील करीत आहे. त्याचबरोबर सुदानमध्ये गुंतवणूकही करीत असल्याचे अब्देललतिफ यांनी सांगितले.

मुक्त व्यापार क्षेत्राची निर्मिती, मोठ्या कृषी प्रकल्पाच्या उभारणीसाठी या सहा अब्ज डॉलर्सची गुंतवणूक वापरली जाईल. तर आर्थिक संकटात सापडलेल्या सुदानच्या मध्यवर्ती बँकेत युएई 30 कोटी डॉलर्सचा निधी जमा करणार आहे. यामुळे सुदानवरील आर्थिक संकटाचा भार कमी होईल, असा दावा केला जातो. तर एकूण गुंतवणुकीपैकी चार अब्ज डॉलर्स रेड सी बंदर उभारण्यासाठी वापरले जातील. दुबईची डीएएल ग्रुपआणि अबुधाबी पोर्ट्‌‍स या दोन कंपन्या सदर बंदराची निर्मिती करणार आहेत. ‘पोर्ट सुदान’पेक्षा हे नवे बंदर मोठे आणि अत्याधुनिक सेवेने सज्ज असेल, असा दावा केला जातो. या नव्या बंदरात मुक्त व्यापार आणि औद्योगिक क्षेत्र उभारण्यात येईल, अशी माहिती अब्देललतिफ यांनी दिली. काही दिवसांपूर्वी सुदानचे राष्ट्राध्यक्ष जनरल अब्देलफताह अल-बुऱ्हान यांनी युएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झाएद यांची भेट घेऊन या गुंतवणुकीबाबत चर्चा केली होती.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यता सुदानमध्ये लष्कराने पुकारलेल्या बंडानंतर जनरल अब्देलफताह अल-बुऱ्हान यांनी सुदानच्या राजवटीचा ताबा घेतला. तोपर्यंत सुदानला आर्थिक सहाय्य करणाऱ्या पाश्चिमात्य देशांनी जनरल बुऱ्हान यांचा बहिष्कार करून सुदानला देण्यात येणारे सहाय्य रोखले होते. यामुळे सुदानवर मोठे आर्थिक संकट कोसळले होते. अशा परिस्थितीत, युएईने सुदानमध्ये सहा अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली.

दरम्यान, सुदान हा आफ्रिका आणि आखाताला विभागणाऱ्या रेड सीच्या क्षेत्रात येणारा देश आहे. रेड सी हे व्यापारी तसेच सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे सागरी क्षेत्र आहे. अशा या सागरी क्षेत्रात बंदर उभारण्याची तयारी युएईने केली आहे. यासाठी युएईने सुदानची केलेली निवड लक्षवेधी ठरते.

leave a reply