इस्रायली राष्ट्राध्यक्षांच्या उपस्थितीत तेल अवीवमध्ये युएईचा दूतावास सुरू

तेल अवीव/दुबई – इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हरझॉग यांच्या उपस्थितीत बुधवारी तेल अवीवमध्ये संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) दूतावासाचे उद्घाटन करण्यात आले. इस्रायलमध्ये आखाती अरब देशाने दूतावास सुरू करण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने इस्रायल व युएईमध्ये ऐतिहासिक शांतीकरारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर दोन्ही देशांशी परस्परांशी सहकार्य वाढविण्यासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली असून दूतावास सुरू होणे हा त्यातील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

युएईचा दूतावास‘इस्रायलमध्ये दूतावास उघडणे ही अत्यंत सन्मानाची बाब आहे. 10 महिन्यांपूर्वी दोन्ही देशांनी अब्राहम करारावर स्वाक्षर्‍या केल्या होत्या. दोन्ही देशांमधील जनतेत शांतता व समृद्धीचे नाते निर्माण व्हावे हा दृष्टिकोन त्यामागे होता. दूतावास चालू होणे ही फक्त सुरुवात आहे. युएई व इस्रायल हे दोन्ही देश नव्याचा शोध घेणारे देश म्हणून ओळखले जातात. ही नवी दृष्टी दोन्ही देशांच्या संपन्नतेसाठी उपयुक्त ठरेल’, अशा शब्दात युएईचे राजदूत मोहम्मद महमूद अल खाजा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष हरझॉग यांनी, युएईचा दूतावास उघडणे हे संपूर्ण आखातासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे, या शब्दात घटनेचे स्वागत केले. ‘तेल अवीवच्या आकाशात अमिरातीचा झेंडा फडकणे हे अशक्यप्राय असे स्वप्न होते. पण आज हे वास्तव आहे. ही प्रक्रिया आता थांबून चालणार नाही. माझे नुकतेच आखाती देशांमधील नेत्यांशी टेलिफोनवरून संभाषण झाले. त्यातून इस्रायलसाठी या क्षेत्रात अनेक भागीदार व सहकारी असल्याचे माझ्या लक्षात आले. आम्ही याचा विचारही केला नव्हता’, या शब्दात इस्रायली राष्ट्राध्यक्षांनी आखाती देशांबरोबर राजनैतिक संबंधांच्या प्रक्रियेला वेग देण्याचे संकेत दिले आहेत.

अरब देश इस्रायलबरोबर सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याच्या बातम्या गेल्या काही वर्षांपासून सातत्याने समोर येत होत्या. युएई, बाहरिन, ओमान यासारख्या देशांनी त्याचे संकेत दिले असले तरी उघड भूमिका घेण्याचे नाकारले होते. मात्र अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासाठी पुढाकार घेऊन गेल्या वर्षी इस्रायल व युएईमध्ये ऐतिहासिक ‘अब्राहम शांती करार’ घडवून आणला. या करारानंतर दोन्ही देशांनी वेगाने सहकार्य वाढविण्यासाठी पावले उचलल्याचे समोर येत आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दोन देशांमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असा इंधन करार पार पडला होता. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये हवाई तसेच सागरी मार्गाने व्यापारी वाहतूक सुरू झाली असून पर्यटनालाही चालना देण्यात आली आहे. दोन्ही देशांनी ‘लँड कॉरिडॉर’ तसेच तंत्रज्ञानविषयक सहकार्यावरही बोलणी सुरू केली आहे. युएईने इस्रायलमध्ये 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचेही जाहीर केले आहे.

दोन्ही देशांनी पहिल्या राजदूतांचीही घोषणा केली आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीस इस्रायली परराष्ट्रमंत्र्यांनी युएईला भेट देऊन अबुधाबीमध्ये इस्रायली दूतावास सुरू केला होता. त्यानंतर आता तेल अवीवमध्ये युएईचा दूतावास सुरू झाला असून दोन देशांमधील सहकार्याला अधिकच गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

leave a reply