युएई बराका अणुप्रकल्पातील ‘युनिट २’ कार्यान्वित करणार

- वर्षअखेरीस ‘न्यूक्लिअर इमर्जन्सी’ सरावाचे आयोजन

‘युनिट २’

दुबई – ‘युएई’ने बराका अणुऊर्जा प्रकल्पातील ‘युनिट २’ कार्यान्वित करण्याची घोषणा केली. अवघ्या वर्षभराच्या आत बराका अणुप्रकल्पातील दोन अणुभट्ट्या कार्यान्वित करून आपल्या देशाने मोठे यश प्राप्त केल्याचा दावा युएईच्या सरकारने केला आहे. दरम्यान, इराणच्या अणुकार्यक्रमावरुन आखाती क्षेत्रात तणाव निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत, युएईने आपल्या अणुप्रकल्पातील दुसरी अणुभट्टी कार्यान्वित करण्याबाबत केलेली घोषणा महत्त्वाची ठरते.

युएईच्या ‘फेडरल अथॉरिटी फॉर न्यूक्लिअर रेग्युलेशन्स’ने (एफएएनआर) अल-धाफ्रा येथे ‘युनिट २’ अणुभट्टी कार्यान्वित करण्याची परवानगी दिली. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या निकषांवर बराका अणुप्रकल्पाचे काम सुरू असल्याचा दावा युएई करीत आहे. बराका हा अरब देशांमधील पहिला अणुप्रकल्प ठरतो. या अणुप्रकल्पाची निर्मिती दक्षिण कोरियाच्या ‘केप्को’ कंपनीने केली आहे. युएई या प्रकल्पात एकूण सात अणुभट्ट्यांच्या निर्मिती करणार आहे.

‘युनिट २’

यापैकी पहिली अणुभट्टी गेल्या वर्षीच कार्यरत झाली आहे. अबु धाबीच्या अल-धाफ्रा भागात युएईने बराका हा पहिला अणुप्रकल्प सुरू केला. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात या प्रकल्पातील ‘युनिट १’ हे राष्ट्रीय पॉवर ग्रीडशी जोडण्यात आले. डिसेंबर महिन्यातच झालेल्या चाचणीत सदर अणुभट्टीने आपल्या क्षमतेच्या १०० टक्के ऊर्जा निर्मिती केली होती. या वर्षी सदर अणुभट्टीचा व्यावसायिक स्तरावर वापर सुरू होईल.

तर तिसरी व चौथी अणुभट्टी पुढच्या वर्षभरात कार्यरत होतील, असा दावा केला जातो. या चारही अणुभट्ट्या पूर्णपणे कार्यरत झाल्यानंतर ५६०० मेगावॅट ऊर्जेची निर्मिती करू शकतात. असे झाले तर युएईच्या मागणीच्या एकूण २५ टक्के वीजपुरवठा या चार अणुभट्ट्यांद्वारे होईल, असे बोलले जाते. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगातील युएईचे प्रतिनिधी हमाद अल-काबी यांनी आपल्या देशाच्या या भूमिकेचे स्वागत केले.

बराका अणुप्रकल्पातील युनिट २ कार्यान्वित करण्याची घोषणा, युएईचे नेतृत्त्व द्रष्टे असल्याचे दाखवून देत आहे, असे काबी म्हणाले. तसेच हे सामरिक यश असल्याचा दावा काबी यांनी केला.

दरम्यान, बराका अणुप्रकल्पातील आणखी एक अणुभट्टी सुरू करणार्‍या युएईने या वर्षाखेरीस आण्विक आणीबाणी सरावाचे आयोजन केले आहे. ३६ तासांच्या या सरावात सुमारे १७० देश सहभागी होणार असल्याचा दावा केला जातो. या सरावाच्या निमित्ताने आण्विक आणीबाणीच्या काळात आंतरराष्ट्रीय प्रतिसाद आणि क्षमता तपासली जाणार आहे. इराणच्या किनारपट्टीपासून ३४० किलोमीटर अंतरावर असणार्‍या बराका अणुप्रकल्पातच या सरावाचे आयोजन होणार असल्याची माहिती काबी यांनी दिली.

युुएईच्या पूर्वेकडील इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत तणाव वाढत चालला आहे. इराण अण्वस्त्रनिर्मिती करीत असल्याचा आरोप केला जातो. तर युएईच्या दक्षिणेकडे इराणसंलग्न हौथी बंडखोरांपासून ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ल्यांचा धोकाही कायम आहे. अशा परिस्थितीत, आपल्या अणुप्रकल्पाच्या सुरक्षेसाठी तसेच येत्या काळातील संकटांना तोंड देण्यासाठी या सरावाची आवश्यकता असल्याचे काबी यांनी अधोरेखित केले.

leave a reply