१२.६ टक्क्यांच्या विकासदरासह भारत जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था बनेल

-‘ओईसीडी’चा अंदाज

विकासदरासहनवी दिल्ली – १२.६ टक्क्यांच्या विकासदरासह भारत जगातील सर्वात वेगाने विकास करणारी अर्थव्यवस्था बनेल, असा दावा ‘द ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कॉ-ऑपरेशन अ‍ॅण्ड डेव्हलप्मेंट (ओईसीडी) या संस्थेने केला आहे. काही महिन्यांपूर्वी या संस्थेने २०२१-२२ या वर्षात भारत ७.९ टक्के विकासदर राखून प्रगती करील असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र या अंदाजात आता बदल करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात सरकारने सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात ११ टक्क्यांचा, तर आरबीआयने १०.५ टक्के विकासदराचा अंदाज वर्तविला होता. तसेच क्रिसिल या जागतिक पतमानांकन संस्थेनेही भारताच्या अर्थव्यवस्थेबाबतचे आधीचे अंदाज बदलले होते व पुढील आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था ११ टक्के इतका विकासदर गाठेल, असा दावा केला होता.

Advertisement

भारतीय अर्थव्यवस्था २०२१-२२ या आर्थिक वर्षात जगात सर्वाधिक वेगाने प्रगती करणारी अर्थव्यवस्था ठरेल, असा अंदाज ‘ओईसीडी’ने वर्तविला आहे. भारताच्या या विकासगतीच्या आसपास इतर कोणताही देश नाही. चीनचा विकासदर ७.८ टक्के इतका राहील, असे ‘ओईसीडी’ने आपल्या अहवालात म्हटले असून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर ६.५ टक्क्यांवर पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच जागतिक अर्थव्यवस्था ५.६ टक्क्याने प्रगती करेल, असे ‘ओईसीडी’चा अंदाज आहे.

विकासदरासह‘ओईसीडी’ने याआधी डिसेंबर महिन्यात व्यक्त केलेल्या सर्व अंदाजात मोठे बदल केले आहेत. कोरोनाच्या काळात जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला होता. मात्र आता कोरोनाच्या साथीवर लस उपलब्ध झाली आहे. तसेच आघाडीच्या देशांनी कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी निरनिराळ्या पॅकेजेस घोषित केली असून अर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचे परिणाम दिसून येत असल्याचे ‘ओईसीडी’चे म्हणणे आहे.

चालू आर्थिक वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेला कोरोनाच्या साथीचा जबरदस्त फटका बसला आहे. भारताची अर्थव्यवस्था उणे विकासदराने प्रगती करीत होती. कोरोना काळात पहिल्या सहा महिन्यात विकासदर उणे सात टक्के इतका घसरला होता. मात्र तिसर्‍या तिमाहीत पॉझिटिव्ह वाढ दिसून आली होती. भारतीय अर्थव्यवस्था कोरोनाच्या संकटातून सावरल्याचे हे संकेत असल्याचे विश्‍लेषक सांगत होते. या पार्श्‍वभूमीवर विविध जागतिक पतमानांकन संस्था २०२१-२२ साठी भारताच्या विकासदराबाबत व्यक्त केलेले अंदाज बदलत आहेत.

‘ओईसीडी’नेही भारताच्या उत्पादन क्षेत्रात होत असलेली वाढ, वाढलेली मागणी, सरकारकडून अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी करण्यात येणार्‍या उपायांची दखल घेतली आहे. याआधी डिसेंबरमध्ये व्यक्त केलेल्या अंदाजात ‘ओईसीडी’ने भारताचा विकासदर ७.९ टक्के राहील असे म्हटले होते. मात्र या अंदाजात ४.७ टक्क्यांचा बदल करण्यात आला आहे.

leave a reply