युएई सुरक्षेसाठी एकाच देशावर विसंबून राहणार नाही

- युएईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे स्पष्ट संकेत

एकाच देशावरदुबई – ‘अमेरिका आणि युएईमध्ये संरचनात्मक आणि कधीही मोडता येणार नाही, असे सहकार्य आहे. पण महासत्तांच्या स्पर्धेत युएई कुठल्याही एकाची बाजू घेणार नाही. म्हणूनच आर्थिक आणि सुरक्षेसंदर्भातील मुद्यांवर एकाच देशावर असलेले अवलंबित्व युएई कमी करणार आहे. संरक्षणसज्जता वाढविणारा आणि क्षेत्रीय तणाव कमी करण्यासाठी सहाय्य करणारा सहकारी देश युएईला अपेक्षित आहे’, अशा नेमक्या शब्दात युएईने अमेरिकेला आपला संदेश दिला.

चार दिवसांपूर्वी अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने परदेशी शक्ती अमेरिकेच्या राजकारणात हस्तक्षेप करीत असल्याचा अहवाल तयार केला होता. राजेशाही व्यवस्था असलेल्या व अजूनही अमेरिकेच्या दृष्टीकोनातून अनुदार सामाजिक व्यवस्था असलेल्या युएईवर अमेरिकेतून टीका होऊ नये, यासाठी युएई हा राजकीय हस्तक्षेप करीत असल्याचा ठपका अमेरिकेच्या ‘नॅशनल इंटेलिजन्स काऊन्सिल’च्या अहवालात ठेवला होता. अमेरिकन अभ्यासगट, विद्यापीठांच्या संशोधनावर प्रभाव टाकण्यासाठी युएईने कोट्यवधी डॉलर्स खर्च केल्याचा आरोपही या अहवालात करण्यात आला होता.

अमेरिकेचा निकटतम सहकारी देश असलेल्या युएईवर गुप्तचर विभागाने केलेल्या या आरोपांमुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले जातील, असा इशारा अमेरिकेतील माध्यमांनी दिला होता. हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर पुढच्या काही तासातच युएईच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांनी केलेल्या घोषणेनंतर अमेरिकेत दुरावा निर्माण झाल्याचे संकेत मिळत आहेत. ‘एमिराट्स पॉलिसी सेंटर अबू धाबी स्ट्रॅटेजिक डिबेट’ या परिसंवादात बोलताना युएईच्या राष्ट्राध्यक्षांचे राजकीय सल्लागार अन्वर गरगाश यांनी आपला देश अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करणार असल्याचे स्पष्ट केले.

‘राजे शेख मोहम्मद बिन झाएद अल नह्यान यांनी युएईसाठी काही धोरणे निश्चित केली आहेत. युएईसाठी अतिशय महत्त्वाचे असलेल्या हवामानबदल, जल आणि अन्न सुरक्षा यासारख्या मुद्यांवर इतर देशांबरोबर सहकार्य वाढविण्याची सूचना शेख मोहम्मद यांनी केली आहे’, असे गरगाश म्हणाले. ‘एकाच देशावर अवलंबून राहिल्यास युएई सुरक्षित राहणार नाही. म्हणूनच युएईने सुरक्षेसंदर्भात वेगवेगळ्या देशांबरोबर चर्चा सुरू केली आहे. त्याचबरोबर दुसऱ्या देशासाठी युएई आपले सार्वभौमत्व पणाला लावणार नाही, असे लक्षवेधी विधान गरगाश यांनी केले.

‘संपूर्ण जगाचे ध्रूवीकरण सुरू असून जागतिक महासत्तांमध्ये तणाव वाढत चालला आहे. मध्यम आकाराची सत्ता म्हणून युएईचे परराष्ट्र धोरण काटेतोलपणे आखलेले असेल. त्यामुळे कोणत्याही मुद्यावर उघड टीका करण्याचे टाळून युएई शांतपणे मुत्सद्देगिरीचा वापर करील. यासाठी काहीवेळेस अप्रिय व्यक्तींबरोबरही सहकार्य प्रस्थापित करावे लागू शकते, याची जाणीव युएईने ठेवली आहे’, असे गरगाश यांनी या परिसंवादात स्पष्ट केले.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्ये इराणचा अणुकार्यक्रम, येमेनमधील हौथी बंडखोर, मानवाधिकार आणि इतर मुद्यांवरुन अमेरिका व युएईमधील संबंध ताणले गेले आहेत. शस्त्रनिर्यात रोखणाऱ्या बायडेन प्रशासनाच्या इराद्यांवर युएईने प्रश्न उपस्थित केले होते. यामुळेच पुढच्या काळात युएई आपल्या सुरक्षेसाठी कुठल्याही एका देशावर विसंबून राहणार नाही, असे सांगून युएईकडून बायडेन प्रशासनावरील अविश्वास व्यक्त करण्यात येत आहे. यासाठी इस्रायल, चीन व भारतासारख्या देशाशी सहकार्य वाढवून युएईने रशियाबरोबरही सहकार्य प्रस्थापित करण्याची तयारी केली आहे. युएईच्या राष्ट्राध्यक्षांचे राजकीय सल्लागार अन्वर गरगाश ही बाब राजनैतिक भाषेत मांडत असल्याचे दिसते.

leave a reply