इराणमधील निदर्शकांवर दहशतवादी हल्ला

- पाच निदर्शकांचा बळी, तर १० जखमी

निदर्शकांवरतेहरान – इराणच्या खुझेस्तान प्रांतात हिजाबसक्तीच्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्या निदर्शकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जणांचा बळी गेला. इराणच्या आणखी दोन शहरांमध्ये देखील निदर्शकांवर गोळीबार झाल्याचा दावा केला जातो. तर राजधानी तेहरानच्या मेट्रो स्टेशनमध्ये इराणच्या पोलिसांनी गोळ्या झाडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने इराणच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. इराणने आपल्या कैदेतील निदर्शकांची सुटका करावी, अशी मागणी या संघटनेने केली. पण इराणच्या न्यायालयाने आणखी तीन निदर्शकांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावून आपण मानवाधिकारांवरून होणाऱ्या टीकेला महत्त्व देत नसल्याचे दाखवून दिले.

निदर्शकांवरइराणमध्ये हिजाबसक्तीच्या विरोधातील आंदोलनात शालेय विद्यार्थ्यांपासून व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांनीच यात सहभाग घेतला आहे. हे आंदोलन इराणच्या राजवटीसाठी आव्हान ठरू लागल्याचा दावा केला जातो. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेले सदर आंदोलन दडपण्यासाठी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सने निदर्शकांवर केलेल्या कारवाईत ३४४ जणांचा बळी गेला आहे.

बुधवारी इराणच्या नैॠत्येकडील खुझेस्तान प्रांतातील इझेह शहरात शांतीपूर्ण निदर्शनांचे आयोजित केले होते. इराणच्या सुरक्षा दलाचे जवान निदर्शकांना वेढा घालून होते. इथे अचानकपणे मोटारबाईकवरुन आलेल्या दोघांनी निदर्शक व जवानांवर बेछूट गोळीबार केला. यामध्ये पाच निदर्शकांचा बळी गेला तर १० जण जखमी झाले. हा एक दहशतवादी हल्ला असल्याचा दावा इराणच्या यंत्रणा करीत आहेत. पण इथे जवान तैनात असतानाही हल्लेखोर कसे बचावले, असा प्रश्न इराणचे निदर्शक करू लागले आहेत.

निदर्शकांवरइझेह शहरात झालेला हा एकमेव दहशतवादी हल्ला नव्हता, अशी माहिती समोर येत आहे. इराणच्या कुर्दिस्तान प्रांतातील कुरवेह शहरातही निदर्शकांवर गोळीबार झाला. तर इस्फाहन शहरात बसिज मिलिशिया या सशस्त्र गटाच्या सदस्यांवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्याचा दावा सरकारसंलग्न वृत्तसंस्थेने केला. पण तेहरान मेट्रो स्टेशनमधील घटनेने इराणच्या सुरक्षा यंत्रणेवर सडकून टीका केली जात आहे. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनीच प्रवाशांवर बेछूट गोळ्या झाडल्याचे दावे पाश्चिमात्य वर्तमानपत्रांनी केला आहे. तसेच एका महिलेला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

दरम्यान, आपल्या देशात सुरू असलेल्या दंगलीसाठी इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन आमिर-अब्दोल्लाहियान यांनी इस्रायल आणि पाश्चिमात्य देशांना जबाबदार धरले. ‘इस्रायल, काही पाश्चिमात्य देशांचे नेते आणि सुरक्षा यंत्रणा एकत्र येऊन इराणमध्ये गृहयुद्ध भडकविण्याच्या तसेच इराणचे तुकडे करण्याची तयारीत आहेत. पण इराण म्हणजे लिबिया किंवा सुदान नाही’, असा इशारा इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिला. याआधीही इराणने आपल्या देशातील हिंसाचारासाठी अमेरिका, इस्रायल आणि युरोपिय देशांसह सौदी अरेबियाला जबाबदार धरले होते. तसेच सौदीबाबत इराणची सहनशीलता संपुष्टात आल्याची धमकीही इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली होती.

leave a reply