उघुरांचा वंशसंहार करणार्‍या चीनच्या हिवाळी ऑलिंपिकवर ब्रिटनने बहिष्कार टाकावा

- ब्रिटनच्या संसद समितीची मागणी

लंडन – ‘झिंजियांग प्रांतात उघुरांचा वंशसंहार करणार्‍या चीनला अद्दल घडविण्यासाठी ब्रिटनने पुढच्या वर्षी बीजिंगमध्ये होणार्‍या हिवाळी ऑलिंपिकवर बहिष्कार टाकावा. झिंजियांग प्रांतातील चिनी उत्पादनांच्या खरेदीवर बंदी घालावी’, अशी मागणी ब्रिटनच्या संसदीय समितीने केली. उघुरांच्या मानवाधिकारांप्रकरणी चीनला जबाबदार धरण्याची हीच वेळ असल्याचे आवाहन या समितीने आपल्या अहवालातून केले आहे. अमेरिकेचे लोकप्रतिनिधी देखील बायडेन प्रशासनाकडे अशीच मागणी करीत आहेत.

उघुरांचा वंशसंहार करणार्‍या चीनच्या हिवाळी ऑलिंपिकवर ब्रिटनने बहिष्कार टाकावा - ब्रिटनच्या संसद समितीची मागणीब्रिटनच्या संसदेतील परराष्ट्र धोरणविषयक समितीने गुरुवारी सादर केलेल्या अहवालात पंतप्रधान बोरिस जॉनसन आणि त्यांच्या सहकार्‍यांकडे चीनविरोधात कठोर भूमिका घेण्याचे मागणी केली. ‘एखाद्या मोठ्या अत्याचार आणि शोकांतिकेनंतर, पुन्हा असे कधी घडू देणार नाही, असे जगाचे म्हणणे असते. पण हे अत्याचार यापुढेही सुरूच राहतात. अजूनही चीन उघुरांवर करीत असलेल्या अत्याचारांवर कारवाई करण्याची वेळ गेलेली नाही’, असे आवाहन या अहवालात केले आहे.

या समितीतील कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे प्रमुख टॉम टगेनढॅट यांनी चीन झिंजियांग प्रांतातील उघुरवंशियांवर अत्याचार करीत असल्याची टीका केली. ‘चीनच्या कम्युनिस्ट राजवटीकडून झिंजियांगमध्ये होत असलेल्या अत्याचाराकडे कुठल्याही सुसंस्कृत सरकारने दुर्लक्ष न करता, त्याकडे आंतरराष्ट्रीय संकट म्हणून पाहण्याची गरज आहे’, असे टगेनढॅट म्हणाले.

उघुरांचा वंशसंहार करणार्‍या चीनच्या हिवाळी ऑलिंपिकवर ब्रिटनने बहिष्कार टाकावा - ब्रिटनच्या संसद समितीची मागणी‘जर आपण चीन करीत असलेल्या या अत्याचाराकडे दुर्लक्ष करीत राहिलो तर, आपणच या ड्रॅगनला आपल्या आयुष्यात घर करून देण्यासाठी अधिकाधिक सहाय्य करू’, असा इशारा टगेनढॅट यांनी दिला. उघुरांचा वंशसंहार करणार्‍या चीनला अद्दल घडविण्यासाठी ब्रिटनने पुढील वर्षी बीजिंगमध्ये होणार्‍या हिवाळी ऑलिंपिकवर बहिष्कार टाकावा. या स्पर्धेसाठी ब्रिटनच्या नेत्यांनी उपस्थित राहू नये, अशी मागणी टगेनढॅट व ब्रिटनच्या इतर संसद सदस्यांनी या समितीच्या अहवालातून केली.

ब्रिटनचे जॉनसन सरकार चीनविरोधात आक्रमक भाषेचा वापर करीत असले तरी प्रत्यक्षात कारवाई तितकी आक्रमक नसल्याची टीका या समितीने केली. उघुरवंशियांवरी अत्याचार, तिबेट गिळंकृत करणार्‍या आणि हाँगकाँगमधील लोकशाही दडपणार्‍या चीनच्या हिवाळी ऑलिंपिकवर ब्रिटनने बहिष्कार टाकावा, अशी मागणी ब्रिटनमध्ये आश्रयित असलेल्या उघुर, तिबेटी नागरिकांनी केली होती.

दोन महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रसंघातील माजी राजदूत निक्की हॅले यांनी चीनच्या कम्युनिस्ट राजवटीची तुलना दुसर्‍या महायुद्धातील हिटलरच्या नाझी राजवटीशी केली होती. हिटलरने ज्याप्रकारे ज्यूधर्मियांचे हत्याकांड घडविले होते, तसेच चीन उघुरांबाबत करीत आहे. दुसर्‍या महायुद्धाच्या आधी अमेरिका व मित्रदेशांनी बर्लिन ऑलिंपिकवर बहिष्कार टाकला होता, तसाच अमेरिकेने चीनच्या 2022 सालच्या हिवाळी ऑलिंपिकवरही बहिष्कार टाकावा, अशी मागणी हॅले यांनी केली होती.

leave a reply