क्रिमिआनजिक ब्रिटीश युद्धनौका व रशियन जेट्समध्ये चकमक

- ब्रिटनने रशियाचे दावे फेटाळले

लंडन/मॉस्को – क्रिमिआच्या सागरी हद्दीतून जाणार्‍या ब्रिटीश युद्धनौकेजवळ रशियन गस्तीनौकांनी ‘वॉर्निंग शॉट्स’ दिल्यानंतर रशियन जेट्सनी तिच्या मार्गात बॉम्ब्स टाकल्याचा खळबळजनक दावा रशियाने केला. मात्र ब्रिटनने हा दावा तात्काळ फेटाळला असून, ब्रिटीश नौदल आपल्या तत्त्वांशी बांधिल राहिली, असे प्रत्युत्तर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिले आहे. या घटनेमुळे ब्रिटन व रशियामधील तणाव अधिकच चिघळल्याचे दिसत आहे.

क्रिमिआनजिक ब्रिटीश युद्धनौका व रशियन जेट्समध्ये चकमक - ब्रिटनने रशियाचे दावे फेटाळलेबुधवारी ब्रिटनची युद्धनौका ‘एचएमएस डिफेन्डर’ युक्रेनच्या ओडेसा बंदरातून जॉर्जियाकडे प्रवास करीत होती. रशियाने ताबा मिळविलेल्या क्रिमिअनजिकचे सागरी क्षेत्र हा या मार्गातील ‘शॉर्टेस्ट रुट’ म्हणून ओळखण्यात येतो. त्यामुळे ‘एचएमएस डिफेन्डर’ने क्रिमिआनजिकच्या 19 किलोमीटर्सच्या हद्दीतून पुढे जाण्यास सुरुवात केली. रशियाच्या दाव्यांनुसार, ब्रिटीश युद्धनौका आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करून रशियन हद्दीतून प्रवास करीत होती. मात्र क्रिमिआ हा युक्रेनचा भाग असून आपण युक्रेनच्या हद्दीतून प्रवास करीत असल्याचे ब्रिटीश युद्धनौकेकडून सांगण्यात आले.

‘एचएमएस डिफेन्डर’च्या या भूमिकेमुळे बिथरलेल्या रशियाने आपल्या काही गस्तीनौका तिच्यावर टेहळणीसाठी पाठविल्या. रशियन गस्तीनौकांनी ब्रिटीश युद्धनौकेचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न केला. एक गस्तीनौका ‘एचएमएस डिफेन्डर’ पासून अवघ्या 100 मीटर्सच्या अंतरावर आली होती, अशी माहिती ब्रिटीश सूत्रांनी दिली. गस्तीनौकांनी ब्रिटनच्या युद्धनौकेजवळ ‘वॉर्निंग शॉट्स’ झाडल्याचा दावा रशियाने केला. या ‘वॉर्निंग शॉट्स’नंतर रशियाच्या लढाऊ विमानांनी ‘एचएमएस डिफेन्डर’ वरून घिरट्या घालण्यास सुरुवात केली. काही लढाऊ विमानांनी ब्रिटीश युद्धनौकेला रोखण्यासाठी समुद्रात बॉम्ब्स टाकले असा दावा रशियन संरक्षणदलाने केला आहे.क्रिमिआनजिक ब्रिटीश युद्धनौका व रशियन जेट्समध्ये चकमक - ब्रिटनने रशियाचे दावे फेटाळले

रशियाचे हे दावे ब्रिटनने स्पष्ट शब्दात फेटाळले आहेत. रशियाकडून ‘ब्लॅक सी’ क्षेत्रात सराव सुरू आहे. त्याची माहिती देण्यासाठी रशियाने गस्तीनौका धाडल्या होत्या. ‘वॉर्निंग शॉट्स’ अथवा ‘बॉम्ब’ टाकण्याच्या कोणत्याही प्रकारच्या घटना घडलेल्या नाहीत, असा स्पष्ट खुलासा ब्रिटनच्या संरक्षणदलाने केला. ब्रिटीश पंतप्रधानांनीही त्याला दुजोरा दिला असून ब्रिटीश नौदल आपल्या तत्त्वांशी बांधिल आहे, हेच ‘एचएमएस डिफेन्डर’च्या घटनेतून दिसून येते, अशी ग्वाही पंतप्रधान जॉन्सन यांनी दिली.

मात्र रशियाकडून या मुद्यावर आक्रमक भूमिका घेण्यात येत असल्याचे समोर आले आहे. बुधवारी रशियाने ब्रिटीश राजदूतांना समन्स धाडल्याची माहिती समोर आली आहे. त्याचवेळी रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री सर्जेई रायब्कोव्ह यांनी, पुढच्या वेळेस ब्रिटनच्या युद्धनौका क्रिमिआनजिक आल्यास त्या बॉम्ब टाकून उडविण्यात येतील, असे धमकावले आहे. दरम्यान, बुधवारी एका बैठकीदरम्यान रशियाचे लष्करप्रमुख जनरल व्हॅलरी गेरासिमोव्ह यांनी, रशिया अण्वस्त्रांचा वापर करेल, असा गंभीर इशारा दिला आहे.क्रिमिआनजिक ब्रिटीश युद्धनौका व रशियन जेट्समध्ये चकमक - ब्रिटनने रशियाचे दावे फेटाळले

गेली काही वर्षे ब्रिटन व रशियामधील संबंधांमध्ये सातत्याने खटके उडत आहेत. 2014 साली रशियाने क्रिमिआवर केलेल्या हल्ल्यानंतर ब्रिटनने रशियाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. ब्रिटनने रशियाबरोबरील लष्करी सहकार्य थांबवून निर्बंधांची घोषणाही केली होती. ब्रिटनमध्ये झालेल्या सार्वमतांदरम्यान रशियाने हस्तक्षेपाचा प्रयत्न केल्याचे दावेही करण्यात आले होते.

2018 साली ब्रिटनमधील माजी रशियन अधिकारी व त्याच्या मुलीवरील रासायनिक हल्ल्यानंतर दोन देशांमधील तणाव टोकाला पोहोचला होता. त्यानंतर सायबरहल्ल्यांच्या मुद्यावरून दोन देशांमधील दुरावा अधिकच वाढला होता. गेल्याच महिन्यात, रशिया हा ब्रिटनच्या सुरक्षेसाठी असलेल्या पहिल्या क्रमांकचा धोका आहे, असे संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांनी बजावले होते.

leave a reply