चीन, तालिबान आणि माफिया हे बायडेन यांच्या अकार्यक्षमतेचे लाभार्थी – सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांचे टीकास्त्र

वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या कुचकामी अंतर्गत व परराष्ट्र धोरणांचा सर्वाधिक फायदा चीन, तालिबान व मेक्सिकन कार्टेल्स यासारख्यांना झाला आहे, असा घणाघाती आरोप सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी केला. अमेरिकेची सध्याची सगळी धोरणे बायडेन-हॅरिस प्रशासनाला काळिमा फासणार्‍या घोडचुका ठरल्या आहेत, असा टोलाही ग्रॅहम यांनी लगावला. यावेळी रिपब्लिकन सिनेटरांनी कोरोनाच्या मुद्यावर चीनच्या राजवटीला न्यायालयात खेचायला हवे, अशी आक्रमक मागणी केली.

फॉक्स न्यूज या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी निर्वासितांच्या समस्येवरून बायडेन प्रशासनाला लक्ष्य केले. ‘मेक्सिको सीमेवरून अमेरिकेत येणार्‍या निर्वासितांबाबतची बायडेन प्रशासनाची धोरणे अकार्यक्षम व मूर्खपणाची आहेत. यापूर्वी प्रवेश नाकारलेल्या निर्वासितांना प्रशासन अमेरिकेत मोकळे प्रवेशद्वार उपलब्ध करून देत आहे’, अशी टीका ग्रॅहम यांनी केली. बायडेन प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांकडे लक्ष वेधतानाच त्यांनी गेल्या सहा महिन्यात अशा धोरणांमुळे कोणाला फायदा झाला याचा पाढाच वाचला.

‘बायडेन प्रशासनाच्या धोरणांच्या सहा महिन्यातील विजेत्यांची नावेच जाहीर करतो. मेक्सिकोतील ड्रग माफिया, निर्वासितांची घुसखोरी तसेच मानवी तस्करी करणार्‍या मेक्सिकन टोळ्या, अफगाणिस्तानमधील तालिबान, इराणमधील सर्वोच्च धर्मगुरु, रशिया, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि चीन हे सर्व बायडेन प्रशासनाच्या कुचकामी अंतर्गत व परराष्ट्र धोरणाचे मोठे लाभार्थी ठरले आहेत’, असा आरोप रिपब्लिकन सिनेटर ग्रॅहम यांनी केला.

यावेळी लिंडसे ग्रॅहम यांनी कोरोना साथीच्या मुद्यावरून चीनवरही टीकास्त्र सोडले. कोरोनाव्हायरस लॅबमधूनच पसरल्याची आपल्याला पूर्ण खात्री असून यावरून आता चीनच्या राजवटीला अमेरिकी न्यायालयात खेचण्याची वेळ आली आहे, असे ग्रॅहम यांनी बजावले. अमेरिकी जनतेचे आयुष्य व उद्योग उद्ध्वस्त केल्याच्या मुद्यावर चीनच्या कम्युनिस्ट पार्टीला अमेरिकी न्यायालयांमध्ये खेचण्याची परवानगी अमेरिकेच्या नागरिकांना मिळायला हवी, अशी आग्रही मागणी सिनेटरांनी केली. ग्रॅहम यांनी यावेळी 9/11चा खटला व सौदी अरेबियासाठी करण्यात आलेल्या कायद्याचा दाखलाही दिला.

दरम्यान, बायडेन प्रशासन चीनशी संबंध सुधारण्यासाठी पावले उचलत असल्याचे समोर येत आहे. बायडेन व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात फोनवरून चर्चा व्हावी, यासाठी हालचाली सुरू झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्याचवेळी ‘जी20’ गटाच्या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर बायडेन व जिनपिंग यांची भेट व्हावी यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येते.

leave a reply