युक्रेनच्या युद्धाने नवे ‘कोल्ड वॉर’ सुरू केले

- तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते

अंकारा – ‘युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सार्‍या जगाने नव्या शीतयुद्धाच्या पर्वात प्रवेश केला आहे. या युद्धाचे परिणाम येणारी कित्येक दशके अनुभवतील’, असा इशारा तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते इब्राहिम कालिन यांनी दिला. गेल्या सात आठवड्यांपासून सुरू असलेला संघर्ष रोखून रशिया व युक्रेनमध्ये चर्चा सुरू करण्यासाठी तुर्कीने मध्यस्थीचे प्रयत्न केले होते. पण ही चर्चा फिस्कटल्यानंतर तुर्कीकडून ही प्रतिक्रिया आली आहे.

‘कोल्ड वॉर’तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांचे माध्यम प्रवक्ते इब्राहिम कालिन यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या पोस्टमध्ये युक्रेनचे संकट अधिकच तीव्र होणार असल्याचा इशारा दिला. काही देश अल्पकालिन लाभासाठी नव्या शक्तीकेंद्राचा शोध घेत असल्याचा टोला कालिन यांनी लगावला. राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्या प्रवक्त्यांनी याबाबत तपशीलवार सांगण्याचे टाळले. पण युक्रेन युद्धामुळे सारे जग नव्या शीतयुद्धात खेचले गेल्याची चिंता कालिन यांनी व्यक्त केली. तसेच हे शीतयुद्ध लवकर संपणारे नसून याचे परिणाम पुढील कित्येक दशके सहन करावे लागतील, असा इशारा कालिन यांनी दिला.

आत्तापर्यंत तुर्कीने रशिया-युक्रेन युद्धात कुठल्याही देशाची बाजू घेण्याचे टाळले आहे. तसेच पाश्‍चिमात्य देशांनी रशियावर लादलेल्या निर्बंधांचा तुर्कीने कडाडून विरोध केला आहे. तुर्कीचे परराष्ट्र धोरण अतिशय समतोल असल्याचा दावा तुर्कीचे परराष्ट्रमंत्री मेवलूत कावुसोग्लू यांनी केला. तसेच रशियावर निर्बंध लादणार्‍या पाश्‍चिमात्य देशांचा तुर्कीने समाचार घेतला.

‘कोल्ड वॉर’‘येत्या काळात रशियाने युक्रेनमधून सैन्य माघारी घेतले तर पाश्‍चिमात्य देश रशियावरील निर्बंध मागे घेणार का’, असा सवाल परराष्ट्रमंत्री कावुसोग्लू यांनी केला. रशियाने सैन्य माघारी घेऊनही अमेरिका व युरोपिय देश रशियावरील निर्बंध मागे घेणार नसल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमांनी केला होता.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी देखील शीतयुद्धापेक्षाही गंभीर स्थिती निर्माण झाल्याचे म्हटले होते. तसेच यासाठी पाश्‍चिमात्य देश जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केला होता.

leave a reply