रशियाबरोबरील शांतीकरारासाठी भूभाग देण्याचा अंतिम निर्णय युक्रेनचा असेल

- नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग

deal with Russiaहेलसिंकी/किव्ह – ‘नाटोसह पाश्चिमात्य देश युक्रेनची स्थिती मजबूत करण्यासाठी प्रयत्न करीत असले तरी रशियाबरोबरील शांतीकरारासाठी युक्रेनला काही तडजोडी कराव्याच लागतील. यात काही भूभागावर पाणी सोडण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे’, असे वक्तव्य नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी केले आहे. गेल्याच महिन्यात डॅव्होसमधील ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या बैठकीत, अमेरिकेचे ज्येष्ठ मुत्सद्दी हेन्री किसिंजर यांनी युक्रेनने रशियाला काही भूभाग द्यायला हवा, असा सल्ला दिला होता. त्यावर युक्रेनी नेतृत्त्वाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. मात्र त्यानंतर अनेक पाश्चिमात्य नेते व अधिकारी युक्रेनवर रशियाबरोबरील शांतीकरारासाठी दबाव टाकत असल्याच्या बातम्या समोर येतआहेत.

Ukraine's final decisionरशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून बहुतांश पाश्चिमात्य नेते व मुत्सद्दी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी छेडलेल्या युक्रेन युद्धावर जहाल शब्दात टीका करीत आहेत. युक्रेनवर हल्ला करणाऱ्या पुतिन यांना धडा शिकवायला हवा व त्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने युक्रेनला सर्वतोपरी सहाय्य पुरवायला हवे, असा सूर पाश्चिमात्य देशांनी लावून धरला होता. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनीही डॅव्होसमधील बैठकीत, पुतिन यांना जिंकू देता कामा नये असे आवाहन केले होते. मात्र गेल्या काही दिवसात डोन्बास क्षेत्रात रशियाला मिळत असलेल्या सामरिक यशाच्या पार्श्वभूमीवर पाश्चिमात्य नेत्यांचे सूर बदलत असल्याचे समोर येत आहे.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील आघाडीची वृत्तवाहिनी ‘सीएनएन’ने एक वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यात अमेरिका, युरोपिय महासंघ व ब्रिटनने वरिष्ठ अधिकारी शांतीकराराच्या प्रस्तावासाठी हालचाली करीत असल्याचा दावा करण्यात आला होता. यासाठी झालेल्या बैठकांमध्ये युक्रेनी अधिकारी अथवा नेत्यांचा समावेश नसल्याचेही ‘सीएनएन’ने म्हटले होते. हे वृत्त प्रसिद्ध होत असतानाच युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनीही पाश्चिमात्य देशांकडून चर्चेसाठी दडपण आणले जात असल्याचे वक्तव्य केले होते. रशिया-युक्रेन युद्ध दीर्घकाळ लांबताना दिसत असून त्याने पाश्चिमात्य देश जेरीस आले असल्याचे दावेही विश्लेषकांकडून करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर थेट नाटोच्या प्रमुखांनी युक्रेनला शांतीकरारासाठी भूभाग देण्याचा सल्ला देणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

leave a reply