रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात रशियाला इंधननिर्यातीतून विक्रमी कमाई

-सर्वाधिक महसूल युरोपिय देशांमधून

मॉस्को – युक्रेनविरोधातील युद्धाला 100 दिवसांहून अधिक काळ उलटत असतानाच रशियाने या कालावधीत इंधननिर्यातीतून विक्रमी कमाई केल्याचे उघड झाले. युद्धाच्या 100 दिवसांमध्ये रशियाने इंधननिर्यातीतून तब्बल 98 अब्ज डॉलर्सचे उत्पन्न मिळविले आहे. यातील 60 टक्क्यांहून अधिक महसूल युरोपिय देशांमधून आहे. त्यामुळे युक्रेनच्या समर्थनासाठी रशियावर निर्बंध लादणाऱ्या युरोपिय देशांचा दुटप्पीपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे.

Russia-earned-revenueरशियाने युक्रेनविरोधात सुरू केलेल्या लष्करी मोहिमेला 110 दिवस पूर्ण झाले आहेत. रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यापासून पाश्चिमात्य देशांनी सातत्याने रशियाविरोधात निर्बंधांचा मारा चालविला आहे. रशियाच्या इंधनक्षेत्रावर निर्बंध लादून रशियन अर्थव्यवस्थेचा कणा मोडण्याचे इशारे पाश्चिमात्य देशांनी दिले होते. काही दिवसांपूर्वीच युरोपिय महासंघाने रशियातून आयात होणाऱ्या कच्च्या तेलावर बंदी टाकण्याचा निर्णयही जाहीर केला होता.

मात्र असे असले तरी वास्तव स्थिती वेगळी असल्याचे उघड झाले आहे. फिनलंडमधील ‘सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी ॲण्ड क्लीन एअर'(सीआरईए) या गटाने रशियन इंधननिर्यातीबाबतचा विस्तृत अहवाल सादर केला आहे. त्यानुसार, युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर 100 दिवसांच्या कालावधीत रशियाने 98 अब्ज डॉलर्सची विक्रमी कमाई केली आहे. यात 61 टक्के वाटा युरोपिय देशांचा आहे. युरोपातील पाच आघाडीच्या देशांनी रशियन इंधनासाठी सुमारे 40 अब्ज डॉलर्स मोजल्याचे स्पष्ट झाले.

revenue from fuel रशियावर सर्वाधिक अवलंबून असणाऱ्या जर्मनीने 12.7 अब्ज डॉलर्स तर नेदरलॅण्डस्‌‍ने 8.4 अब्ज डॉलर्स मोजले आहेत. इटलीने 8.2 अब्ज, पोलंडने 4.8 अब्ज तर फ्रान्सने 4.5 अब्ज डॉलर्स चुकते केले आहेत. रशियाला सर्वाधिक उत्पन्न कच्च्या तेलाच्या निर्यातीतून मिळाले आहे. रशिया दरमहा युरोपिय देशांना सुमारे सहा कोटी बॅरल्सहून अधिक कच्चे तेल निर्यात करतो. ही पार्श्वभूमी लक्षात घेतली तर रशियाला सर्वाधिक महसूल युरोपिय देशांकडूनच मिळाल्याचे स्पष्ट होते.

कच्च्या तेलाव्यतिरिक्त रशिया युरोपिय देशांना नैसर्गिक इंधनवायू तसेच कोळशाचीही निर्यात करतो. इंधनवायूच्या आयातीसाठी युरोपिय देश रशियाला दरदिवशी 40 कोटी डॉलर्सहून अधिक रक्कम देत असल्याची माहितीही उघड झाली होती. युद्धाला सुरुवात झाल्यावर युक्रेनने सातत्याने या मुद्यावर बोट ठेऊन युरोपिय देशांनी रशियाकडून इंधनाची आयात बंद करावी अशी मागणी केली होती. इंधनातून रशियाला मिळणारा प्रत्येक डॉलर युक्रेनचे अधिकाधिक रक्त सांडणारा ठरेल, अशा कठोर शब्दात युक्रेनने युरोपिय देशांवर टीकास्त्र सोडले होते. मात्र त्यानंतरही इतर देशांना उपदेशाचे डोस देणाऱ्या युरोपिय देशांनी इंधनाच्या माध्यमातून रशियाला विक्रमी महसूल मिळवून दिल्याचे नव्या अहवालातून उघड होत आहे.

दोन महिन्यांपूर्वी ‘ब्लूमबर्ग’ या आघाडीच्या वेबसाईटने दिलेल्या वृत्तात रशिया या वर्षात इंधननिर्यातीतून विक्रमी 320 अब्ज डॉलर्सची कमाई करेल, असा दावा करण्यात आला होता.

leave a reply