मारिपोलच्या स्टील फॅक्टरीत आश्रय घेतलेल्या युक्रेनच्या लष्करी तुकडीची रशियासमोर शरणागती

मारिपोल/मॉस्को – गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ मारिपोलमधील ‘अझोव्हस्टॅल फॅक्टरी’त आश्रय घेतलेल्या युक्रेनच्या लष्करी तुकडीने अखेर रशियासमोर शरणागती पत्करली आहे. युक्रेनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्टील फॅक्टरीतील लष्करी तुकडीला रशियासमोर शरण जाण्याचे आदेश दिल्याचे समोर आले. गेल्या 24 तासांमध्ये या तुकडीतील 260हून अधिक जवान शरण आले असून त्यांना रशियन लष्कराने ताब्यात घेतले आहे. स्टील फॅक्टरीतील माघारीमुळे मारिपोल पूर्णपणे रशियाच्या नियंत्रणाखाली आले आहे.

फेब्रुवारी महिन्यात रशियाने युक्रेनमध्ये लष्करी कारवाई सुरू केल्यापासून मारिपोल ताब्यात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मारिपोल शहरातील बहुतांश भागांवर नियंत्रण मिळविण्यात रशियाला यश आले होते. मात्र मारिपोल शहराच्या एका बाजूला असणाऱ्या सुमारे 10 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असणाऱ्या ‘अझोव्हस्टॅल फॅक्टरी’त युक्रेनच्या ‘अझोव्ह बटालियन’चा भाग असणारे दोन हजारांहून अधिक जवान व शेकडो नागरिकांनी आश्रय घेतला होता.

फॅक्टरीत आश्रय घेतलेल्या लष्करी तुकडीसह नागरिकांनी शरण यावे म्हणून रशियाने काही दिवसांची मुदतही दिली होती. मात्र युक्रेनी तुकडीने अखेरचा जवान शिल्लक असेपर्यंत मुकाबला करु, अशा वल्गना केल्या होत्या. दिलेल्या मुदतीत माघारी न घेतल्याने रशियन फौजांनी फॅक्टरीवर हल्ले चढविण्यास सुरुवात केली होती. हल्ल्यांची तीव्रता वाढल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी गटांनी धावाधाव करीत नागरिकांच्या सुटकेसाठी रशियाशी बोलणी सुरू केली होती. गेल्या महिन्याच्या अखेरीस नागरिकांच्या सुटकेला सुरुवातही झाली होती. एका आठवड्याच्या कालावधीत जवळपास 500हून अधिक नागरिकांना फॅक्टरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले होते.

मात्र त्यानंतरही युक्रेनच्या लष्करी तुकडीने आपला संघर्ष जारी ठेवण्याचे इशारे दिले होते. त्यानंतर रशियन लष्कराने फॅक्टरी परिसरातील हल्ले अधिकच वाढविले होते. गेल्या आठवड्यात या फॅक्टरीतील शेकडो युक्रेनी जवान गंभीर जखमी स्थितीत असल्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर जवानांच्या सुटकेसाठी बोलणी सुरू झाली होती. सोमवारी युक्रेनच्या लष्कराने फॅक्टरीतील जवानांना रशियासमोर शरणागती पत्करण्याचे आदेश देऊन माघार घेत असल्याचे जाहीर केले. मारिपोलच्या फॅक्टरीतील युक्रेनची मोहीम संपल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.

फॅक्टरीतील जवानांचा उल्लेख ‘हिरोज्‌‍’ असा करून युक्रेनला अशा नायकांची गरज असल्याचे वक्तव्य राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी केले. युक्रेनच्या ताब्यात असलेल्या रशियन जवानांच्या बदल्यात या जवानांची अदलाबदल केली जाईल, असे संकेतही देण्यात आले आहेत. मात्र त्याला स्पष्ट दुजोरा मिळालेला नाही. मारिपोल फॅक्टरीत रशियन फौजांना गुंतवून ठेवल्याने युक्रेनी लष्कराला इतर भागांमध्ये लष्करी बळ वाढविण्यास वेळ मिळाला, असा दावा युक्रेनच्या काही नेत्यांनी केला आहे.

दरम्यान, रशियाने पूर्व युक्रेन, राजधानी किव्हनजिकचे क्षेत्र तसेच पश्चिम युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र हल्ले चढविल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम युक्रेनमधील लष्करी तळ असणाऱ्या याओरिव्ह भागात हल्ले झाल्याची माहिती युक्रेनी सूत्रांनी दिली.

leave a reply