‘टायटल 42′ काढण्याआधीच अमेरिकेतील निर्वासितांचे लोंढे विक्रमी संख्येने वाढले

वॉशिंग्टन – एप्रिल महिन्यात मेक्सिकोच्या सीमेतून अमेरिकेमध्ये दोन लाख, 34 हजार, 88 निर्वासित दाखल झाले. गेल्या 22 वर्षांमध्ये पहिल्यांदाच मेक्सिकोच्या सीमेतून अमेरिकेत एवढ्या मोठ्या संख्येने निर्वासित दाखल झाल्याचे अमेरिकन यंत्रणांचे म्हणणे आहे. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या आदेशानुसार, निर्वासितांचे लोंढे रोखणारा ‘टायटल 42′ हा कायदा लवकरच मागे घेण्यात येईल. त्यानंतर अमेरिकेतील निर्वासितांच्या लोंढ्यांची ही घुसखोरी तीव्र होईल, असा दावा अमेरिकन माध्यमे करीत आहेत.

अमेरिकेच्या सीमा सुरक्षा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात सीमेवरील निर्वासितांच्या संख्येत 5.8 टक्क्यांची वाढ झाली आहे. मार्च महिन्यात मेक्सिकोच्या सीमेतून 2,21,303 निर्वासित अमेरिकेत दाखल झाले होते. तेच एप्रिल महिन्यात ही संख्या वाढून 2,34,088 वर पोहोचल्याचे अमेरिकन यंत्रणा लक्षात आणून देत आहेत. युरोपकडून निराशा मिळाल्यानंतर अमेरिकेकडे वळलेल्या युक्रेनी निर्वासितांमुळे ही संख्या वाढल्याचा दावा अमेरिकन माध्यमे करीत आहेत.

अमेरिकेतील निर्वासितांच्या लोंढ्यांवर नियंत्रण मिळविल्यास आरोग्य व्यवस्थेअंतर्गत अमेरिकन नागरिकांना चांगल्या सुविधा पुरविल्या जातील, असे सांगून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘टायटल 42′ कायदा लागू केला होता. गेल्या वर्षी ज्यो बायडेन यांनी अमेरिकेची सूत्रे हातात घेतल्यानंतर ट्रम्प यांच्या कारकिर्दीतील बरेचसे कायदे रद्दबातल केले होते. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘टायटल 42′ कायम ठेवला होता.

मात्र येत्या काही दिवसात हा कायदा देखील काढून टाकण्यात येईल, अशी घोषणा राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केली आहे. यानंतर अमेरिकेत दाखल होणाऱ्या निर्वासितांवर मोठी बंधने नसतील, असा दावा केला जातो. असे झाल्यास दरदिवशी मेक्सिकोच्या सीमेतून अमेरिकेत दाखल होणाऱ्या निर्वासितांची संख्या 18 हजारांवर जाईल, अशी भीती अमेरिकन यंत्रणाच व्यक्त करीतआहेत. असे झाल्यास अमेरिकेतील आरोग्य सुविधा तसेच इतर व्यवस्थांवरील ताण अधिकच वाढेल, अशी भीतीही व्यक्त केली जाते.

leave a reply