अमेरिकेच्या बँकिंग क्षेत्रात आलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी ‘पीएसबी’चा आढावा घेतला

नवी दिल्ली – अमेरिकेच्या बँकांवर कोसळलेल्या आर्थिक संकटाचा दाखला देऊन पुढच्या काळात अमेरिकेतील आणखी ५० बँका दिवाळखोरीत जाऊ शकतात, अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकाच नाही, तर युरोपातील बँका देखील धोक्यात आल्या असून यामुळे २००८ सालाहून अधिक भयंकर मंदीचे संकट जगासमोर खडे ठाकल्याचे भीतीदायक इशारे दिले जात आहेत. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची (पीएसबी) बैठक आयोजित केली होती. या बैठकीत बँकांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन अर्थमंत्री सीतारामन यांनी संभाव्य आर्थिक संकटाला तोंड देण्याची क्षमता या बँकांकडे आहे का याची चाचपणी केल्याचे वृत्त आहे.

अमेरिकेच्या बँकिंग क्षेत्रात आलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी ‘पीएसबी’चा आढावा घेतलाअर्थमंत्री सीतारामन यांनी आयोजित केलेल्या या बैठकीत केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, वित्तसचिव विवेक जोशी व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सध्याच्या काळात जागतिक अर्थकारणात होत असलेले फेरबदल, विशेषतः बँकिंग क्षेत्रातील घडामोडींवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. पुढच्या काळात बँकिंग क्षेत्रावर येणाऱ्या संभाव्य ताणाचा विचार करता, या संकटाचा सामना करण्यासाठी बँकांनी सज्ज रहावे, अशी सूचना अर्थमंत्री सीतारामन यांनी यावेळी दिल्याचे वृत्त आहे. तसेच बँकांच्या आर्थिक स्थितीची माहिती घेऊन यावेळी सीतारामन यांनी संभाव्य काळातील आव्हानांसाठी बँकांनी सज्ज रहावे, असे अर्थमंत्र्यांनी बजावले.

दरम्यान, अमेरिकेच्या बँकिंग क्षेत्रावर मोठे संकट कोसळणार असून त्याचे परिणाम केवळ अमेरिका व युरोपिय देशच नाही, तर साऱ्या जगावर होतील, असे इशारे अर्थतज्ज्ञ देत आहेत. २००८ साली ‘लेहमन ब्रदर्स’ ही वित्तक्षेत्रातील कंपनी कोसळली व त्याचा फटका अमेरिकेसह साऱ्या जगाला बसला होता. यामुळे जागतिक मंदी आली आणि त्याचे परिणाम कुठल्याही देशाला टाळता आले नव्हते. पण सिलिकॉन व्हॅली बँक, सिग्नेचर बँक, सिल्व्हरगेट बँक संकटात सापडलेल्या असताना, जगावर २००८ सालच्या मंदीपेक्षाही फार मोठे आर्थिक संकट येणार असल्याचे इशारे तज्ज्ञ देत आहेत. लेहमन ब्रदर्सचे माजी अधिकारी असलेल्या लॉरेन्स मॅक्डोनाल्ड यांनीच याबाबत पूर्वसूचना दिली आहे.

सध्या अमेरिका आपल्या या बँका वाचविण्यासाठी धडपडत असून अमेरिकेच्या बँका सुरक्षित असल्याचे दावे अमेरिकेच्या अर्थमंत्री व राष्ट्राध्यक्षांनीही केले होते. पण या बँकांचे खातेदार त्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. त्यामुळे सध्या तरी अमेरिकेच्या वित्तक्षेत्रात फार मोठ्या उलथापालथी सुरू झालेल्या आहेत. अमेरिकेशी मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्था जोडलेले युरोपिय देश देखील यामुळे असुरक्षित बनल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे.

या साऱ्या घडामोडींकडे भारत अत्यंत बारकाईने पाहत आहे. अमेरिकेतील या घडामोडींचा भारतीय बँकांवर परिणाम होणार नाही, अशी ग्वाही रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली. मात्र याबाबत भारत बेसावध राहणार नाही, असे केंद्रीय अर्थंमत्र्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची बैठक बोलावून स्पष्ट केल्याचे दिसत आहे.

leave a reply