केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन

नवी दिल्ली – केंद्रीयमंत्री आणि ‘लोक जनशक्ती पक्षा’चे प्रमुख रामविलास पासवान यांचे गुरुवारी निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. नुकतीच दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया झाली होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पासवान यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.

रामविलास पासवान

रामविलास पासवान यांच्यावर ह्रदयाविकाराच्या त्रासावर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. अखेर गुरुवारी त्यांची प्राणज्योत मावळली. देशाने एका दूरदर्शी नेत्याला गमावल्याचे सांगून राष्ट्रपती कोविंद यांनी त्यावर शोक व्यक्त केला. संसदेत प्रदीर्घ काळ जनसेवा करणारे सदस्य अशी त्यांची ओळख होती असे राष्ट्रपती म्हणाले. ‘रामविलास यांच्या जाण्याने देशात कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. मी एका मित्राला, मौल्यवान सहकाऱ्याला गमावले आहे. मेहनतीने आणि दृढनिश्चयाने त्यांचा राजकारणात उदय झाला. ते अदभुत सदस्य आणि मंत्री होते’, अशा शब्दात पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला.

१९४६ साली जन्मलेले रामविलास पासवान यांनी १९६९ साली राजकारणात प्रवेश केला. आठ वेळा ते लोकसभेचे सदस्य होते. तसेच पाच पंतप्रधानांच्या काळात त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून कामकाज पाहिले होते. सध्या रामविलास पासवान हे ग्राहक अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री होते. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

leave a reply