भारतीय वायुसेना शत्रूला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यास सक्षम

- वायुसेनाप्रमुख आर. के. एस. भदौरिया

हिंडन – भारतीय संस्कृतीत शांततेला महत्त्व आहे आणि ही शांतता राखण्यासाठी वायुसेनेकडून सर्वतोपरी प्रयत्‍न केले जातील. पण शत्रूशी संघर्ष करण्याची वेळ येते तेव्हा आपण काय करू शकतो, याची क्षमता भारतीय वायुसेनेने दाखवून दिली आहे. लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर वायुसेनेच्या वीरांनी आपली युद्धसज्जता दाखवून दिली. भारतीय वायुसेनेने कमी वेळात या ठिकाणी तैनाती केली असून देशाच्या संरक्षणासाठी वायुसेना प्रत्येक स्थितीत सज्ज असणार असल्याची घोषणा भारताचे वायुसेनाप्रमुख एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदौरिया यांनी केली. दोन दिवसांपूर्वीच वायुसेनाप्रमुखांनी चीन आणि पाकिस्तान, अशा दोन आघाड्यांवर युद्धासाठी भारतीय वायुसेना सज्ज असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वायुसेनेला स्थापना दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

आर. के. एस. भदौरिया

भारतीय वायुसेनेच्या ८८ व्या स्थापना दिवसाचा सोहळा गुरुवारी उत्तरप्रदेशच्या गाजियाबाद येथील हिंडन हवाईतळावर पार पडला. यावेळी बोलताना वायुसेनाप्रमुखांनी भविष्यातील आव्हानांचा देखील उल्लेख केला. भारतीय वायुसेना संक्रमाणाच्या काळातून प्रवास करीत असल्याचे वायुसेनाप्रमुख म्हणाले. ‘आपण अशा संक्रमणाच्या काळात वायुसेनाच्या क्षमतेची परिभाषाच बदलेल आणि एकाचवेळी अनेक आघाड्यांवर मोहिमा राबविल्या जातील. कारण येणारे दशक आव्हानात्मक असेल’, असे वायुसेनाप्रमुख म्हणाले. सध्या आपल्या देशाला आणि वायुसेनेला सायबर हल्ले आणि ड्रोनचा धोका यासारख्या अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. पण नेहमीप्रमाणे वायुसेना प्रत्येक आव्हानासाठी तयारी करीत असून या आव्हानांचा सामना करतच आपल्याला जगातील सर्वोत्कृष्ट वायुसेना उभी करायची आहे, असा आत्मविश्वास वायुसेनाप्रमुखांनी व्यक्त केला.

आर. के. एस. भदौरियावायुसेनेत नुकत्याच सामील झालेली रफायल लढाऊ विमाने, तसेच चिनूक आणि आपाचे हेलिकॉप्टर्समुळे वायुसेनेची ताकद वाढवल्याचे वायुसेनाप्रमुखांनी जाहीर केले. त्याचबरोबर भारतीय संरक्षणदल स्वदेशी बनावटीच्या संरक्षणसाहित्यांनी सज्ज होत असून ही फार मोठी बाब असल्याचे भदौरिया म्हणाले. ब्रह्मोस क्षेपणास्त्र, रोहिणी रडार, तेजस विमान आणि आकाश क्षेपणास्त्र यंत्रणा भारतीय तंत्रज्ञानाने तयार केल्याची आठवण वायुसेनाप्रमुखांनी करुन दिली. तर कोरोना साथीच्या काळात वायुसेनेने दिलेला प्रतिसाद भक्कम होता. या काळात भारताने आपल्या शेजारी देशांना शक्य ती सर्व मदत केली. वायुसेनेने परदेशात अडकलेल्या आपल्या देशबांधवांना सुरक्षितरित्या मायदेशी आणल्याचे एअर चीफ मार्शल भदौरिया यांनी सांगितले. आपल्या हवाई योद्ध्यांचा संकल्प पाहता, सध्याच्या युगात वायुसेना पूर्ण क्षमतेने कार्य करत राहील हे निश्चित असल्याचा विश्वास वायुसेनाप्रमुख भदौरिया यांनी व्यक्त केला.

या निमित्ताने हिंडन हवाईतळावरील कार्यक्रमात वायुसेनेच्या ५६ विमानांनी आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले. विमानांच्या या परेडमध्ये पहिल्यांदाच सहभागी झालेली रफायल विमाने सगळ्यांच्याच आकर्षणाचे केंद्र ठरले. तर स्वदेशी बनावटीच्या तेजस विमानाच्या कसरती, सुखोई-३०एमकेआय तसेच गेल्या काही वर्षांमध्ये भारताने अद्ययावत केलेल्या मिराज २०००, जॅग्वार, मिग-२९, मिग-२१ या विमानांनीही यात सहभाग घेतला होता. याव्यतिरिक्त वायुसेनेच्या निकषांवर यशस्वी ठरलेले स्वदेशी बनावटीचे ‘एलसीएच’ रूद्र हेलिकॉप्टरचा सोलो तर रशियन बनावटीचे एमआय-१७ आणि अमेरिकन बनावटीच्या अपाचे हेलिकॉप्टर्सचा संयुक्त सरावही डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला.

leave a reply