अमेरिकेने ‘साऊथ चायना सी’मधील चीनच्या बेकायदेशीर दाव्यांना आव्हान दिले

- अमेरिकेच्या नौदलाचा इशारा

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या विनाशिकेने आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रात आंतरराष्ट्रीय नियमांच्या चौकटीत राहून गस्त घातली आणि पुढच्या मोहिमेसाठी निघून गेली. त्यामुळे चीनने अमेरिकेच्या विनाशिकेला पिटाळलेले नाही, असे सांगून अमेरिकेच्या नौदलाने चीनचे दावे खोडून काढले. त्याचबरोबर अमेरिकेच्या विनाशिकेची या सागरी क्षेत्रातील गस्त चीनच्या बेकायदेशीर दाव्यांना आव्हान देणारी असल्याचा इशारा अमेरिकी नौदलाने दिला.

जपानमध्ये तैनात असलेल्या अमेरिकेच्या सातव्या आरमारातील विनाशिका ‘युएसएस जॉन मॅक्केन’ने दोन दिवसांपूर्वी ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रात गस्त घातली होती. येथील स्प्रार्टले द्विपसमुहांच्या हद्दीतून अमेरिकेच्या विनाशिकेने प्रवास केल्याचा आरोप चीनने केला होता. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचे मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’ने अमेरिकी विनाशिकेची ही गस्त आपल्या सागरी क्षेत्रातील घुसखोरी असल्याचा ठपका ठेवला होता. तसेच अमेरिकेच्या विनाशिकेने चीनच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिल्याची टीका चिनी मुखपत्राने केली होती.

चीनच्या लष्कराच्या सदर्न थिएटर कमांडने आपली विनाशिका आणि लढाऊ विमाने रवाना करून ‘युएसएस जॉन मॅक्केन’ विनाशिकेला आपल्या सागरी क्षेत्रातून हुसकावून लावल्याचा दावा ‘ग्लोबल टाईम्स’ने केला होता. पण अमेरिकी नौदलाच्या सातव्या आरमाराने चीनचा हा दावा खोडून काढला आहे. ‘अमेरिकी विनाशिकेला कुठल्याही देशाच्या सागरी हद्दीतून पिटाळलेले गेलेले नाही. युएसएस जॉन मॅक्केन विनाशिकाने सागरी वाहतुकीच्या स्वातंत्र्याअंतर्गत आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करून आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रातून प्रवास केला. ही सामान्य सागरी गस्त होती आणि ती पूर्ण झाल्यानंतर अमेरिकी विनाशिका यशस्वीरित्या पुढच्या प्रवासासाठी निघाली’, असे सातव्या आरमाराचे प्रवक्ते लेफ्टनंट जो केली यांनी सांगितले.

त्याचबरोबर ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रात बेकायदेशीररित्या दावे सांगणार्‍या चीनवर लेफ्टनंट केली यांनी ताशेरे ओढले. ‘‘बेकायदेशीर आणि इतर देशांच्या सागरी क्षेत्राला व्यापणारा चीनचा ‘साऊथ चायना सी’वरील दावा सागरी तसेच हवाई वाहतुकीच्या स्वातंत्र्याला धोका ठरतो’’, अशी टीका अमेरिकी अधिकार्‍यांनी केली. तर आग्नेय आशियाई देशांच्या मोबदल्यात चीन बेकायदेशीररित्या या सागरी क्षेत्रावर अधिकार सांगत आहे. अमेरिकी ही सागरी गस्त चीनच्या बेकायदेशीर अधिकाराच्या विरोधात होती, असे लेफ्टनंट केली यांनी ठणकावले. गेल्या काही दिवसांपासून ‘साऊथ चायना सी’मधील अमेरिका व चीनच्या विनाशिकांच्या हालचाली तीव्र झाल्याचा दावा केला जातो. चीनच्या अभ्यासगटानेच काही दिवसांपूर्वी या सागरी क्षेत्रातील हालचालींवर चिंता व्यक्त केली होती. तसेच ज्यो बायडेन यांच्या हाती सत्तासूत्रे जाण्याआधी अमेरिका या सागरी क्षेत्रात चीनच्या विरोधात संघर्ष छेडू शकतो, असा दावा ‘साऊथ चायना सी’ संदर्भात निरिक्षणे नोंदविणार्‍या चिनी अभ्यासगटाने केला होता.

leave a reply