लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी चीनने दिलेला प्रस्ताव भारताने धुडकावला

नवी दिल्ली – लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी चीनने दिलेला प्रस्ताव भारताने धुडकावला आहे. यासंदर्भातील बातम्या प्रसिद्ध झाल्या असून यामुळे भारत चीनवर पुन्हा विश्‍वास ठेवण्यास तयार नसल्याचे उघड होत आहे. लडाखच्या एलएसीवरील ‘फिंगर १’ ते ‘फिंगर ८’ पर्यंत दोन्ही देशांनी सैन्य माघारी घ्यावे, असे चीनने सुचविले होते. मात्र एलएसीवर मार्च महिन्याच्या आधीची स्थिती प्रस्थापित व्हावी, अशी भारताची ठाम मागणी आहे. तसे झाल्याखेरीज तणाव निवळणार नाही, असे भारताने चीनला बजावले आहे.

लडाखच्या पँगाँग सरोवराच्या क्षेत्रातील उत्तरेकडील भागात चीनच्या लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न केला होता. इतकेच नाही तर गलवान खोर्‍यात चीनच्या जवानांनी भारतीय सैनिकांवर हल्ला चढवून कर्नल संतोष बाबू यांच्यासह २० जणांना शहीद केले होते. या हल्ल्यानंतरही चीनने एलएसीवर घुसखोरीचे प्रयत्न सुरू ठेवले. इतकेच नाही तर भारतीय सैनिकांनी नियंत्रण मिळविलेल्या रेचिन ला व इतर टेकड्यांचा ताबा घेण्याचा अयशस्वी प्रयत्न चीनच्या लष्कराने करून पाहिला होता. या दणक्यानंतर भारताने सैन्य माघारी घ्यावे, अशी अपेक्षा चीन व्यक्त करीत आहे. मात्र एकदा का या क्षेत्रातून भारतीय सैनिक माघारी परतले, की चीन या टेकड्यांचा ताबा घेईल, असा इशारा माजी लष्करी अधिकारी देत आहेत.

सध्या लडाखच्या कडक हिवाळ्यात चीनचे जवान कुडकुडत आहेत. तर इथल्या वातावरणाची सवय असलेले भारतीय सैनिक सहजतेने आपले कर्तव्य बजावत आहेत. अशा स्थितीत चीनच्या मागणीनुसार इथून सैन्य माघारी घेऊन चीनला आपली प्रतिष्ठा राखण्याची संधी देता कामा नये, असे माजी लष्करी अधिकारी व सामरिक विश्‍लेषक भारत सरकारला बजावत आहेत. एलएसीवरून भारतीय सैन्य माघारी गेल्यानंतर चीन त्वरित या जागी तैनाती करून भारताचा विश्‍वासघात करू शकतो, ही बाब कधीही नजरेआड करून चालणार नाही. म्हणूनच भारताने आपल्या मागण्या पूर्णपणे मान्य झाल्याखेरीज या क्षेत्रातून सैन्य माघारी घेऊ नये, असे माजी लष्करी अधिकारी सांगत आहेत.

लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी एकाच दिवसापूर्व लडाखच्या एलएसीला भेट देऊन इथल्या सुरक्षेचा आढावा घेतला होता. तसेच लष्कराचे वरिष्ठ अधिकारी देखील नजिकच्या काळात इथला तणाव कमी होण्याची शक्यता नसल्याचा निर्वाळा देत आहेत. त्यामुळे सध्या तरी चीनच्या शब्दांवर विश्‍वास ठेवण्यास भारत तयार नसल्याचे उघड झाले आहे. तर दुसर्‍या बाजूला चीन आपली प्रतिष्ठा सावरण्यासाठी झगडत असल्याचे दिसते. काही दिवसांपूर्वी इथल्या एलएसीसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी नव्या लष्करी अधिकार्‍याची नियुक्ती केली आहे. त्यामुळे चीन या क्षेत्रात नवे डावपेच सुरू करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भारतानेही इथल्या एलएसीवर अतिरिक्त तैनाती वाढविली आहे. त्याचवेळी पँगाँग सरोवर क्षेत्रात गस्त घालण्यासाठी वेगवान बोटी भारत तैनात करणार आहे. हे सरोवर पूर्णपणे आपले असल्याचा चीनचा दावा आहे. तर या सरोवरचा बराचसा भाग आपल्या हद्दीत येतो, असे भारताचे म्हणणे आहे.

leave a reply