हौथींचे हल्ले वाढत असतानाच अमेरिकेने सौदी अरेबियातून ‘पॅट्रियॉट’ क्षेपणास्त्रे माघारी घेतली

‘पॅट्रियॉट’ क्षेपणास्त्रेवॉशिंग्टन/रियाध – अमेरिकेने सौदी अरेबियात तैनात केलेली ‘पॅट्रियॉट’ क्षेपणास्त्र यंत्रणा काढून घेतली आहे. गेल्या काही दिवसात येमेनच्या हौथी बंडखोरांनी सौदी अरेबियावरील हल्ल्यांची तीव्रता वाढविली असतानाच, यंत्रणा माघारी घेणे लक्ष वेधून घेणारे ठरते. अमेरिकेच्या या निर्णयामुळे आखातातील मित्रदेशांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो, असा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात येत आहे.

२०१९ साली इराणसमर्थक हौथी बंडखोरांनी सौदीच्या इंधनप्रकल्पांवर हल्ले चढविले होते. त्यानंतर अमेरिकेने सौदीत ‘पॅट्रियॉट क्षेपणास्त्रे’ तसेच ‘थाड’ यंत्रणा यांच्यासह हजारो सैनिक तैनात केले होते. मात्र बायडेन प्रशासनाने ही तैनाती माघारी घेण्याबाबत हालचाली सुरू केल्या होत्या. अमेरिकेचे संरक्षण धोरण यापुढे चीन व रशियाला मध्यवर्ती ठेऊन आखण्यात येत असून, त्या अनुषंगाने इतर तैनातीवर फेरविचार करण्याचे संकेत बायडेन प्रशासनाकडून देण्यात आले होते.

‘पॅट्रियॉट’ क्षेपणास्त्रेसौदी व मित्रदेश आणि इराणसमर्थक हौथी बंडखोर यांच्यात २०१४ सालापासून संघर्ष सुरू आहे. या संघर्षात सौदीला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागल्याचे सांगण्यात येते. मात्र तरीही सौदीने अद्याप या संघर्षातून माघार घेतलेली नाही. काही महिन्यांपूर्वी सौदीने संयुक्त राष्ट्रसंघ व अमेरिकेच्या मध्यस्थीने हौथी बंडखोरांना शांतीचर्चेचा प्रस्ताव दिला होता. मात्र हौथी बंडखोरांनी त्याला नकार देत संघर्ष अधिक तीव्र करण्याची धमकी दिली आहे.

दुसर्‍या बाजूला इराणच्या अण्वस्त्रांचा धोका वाढत असल्याचेही संकेत मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच अमेरिकी अधिकार्‍यांनी इराणबरोबरील अणुकरार अनिश्‍चित स्थितीत असल्याचे संकेत दिले होते. इराणमध्ये झालेल्या सत्तापालटानंतर स्थिती अधिकच बिघडल्याचे समोर येत असून इराण अणुकार्यक्रमाला अधिक वेग देत असल्याची माहिती समोर येत आहे.

‘पॅट्रियॉट’ क्षेपणास्त्रेया पार्श्‍वभूमीवर सौदीने अमेरिकेला तैनाती कायम ठेवण्याची विनंती केली होती. सौदी अरेबियाचे माजी गुप्तचर प्रमुख प्रिन्स तुर्की अल फैजल यांनी काही दिवसांपूर्वी एका अमेरिकी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतही याचा उल्लेख केला होता. सौदीतील ‘पॅट्रियॉट’ची तैनाती अमेरिकेने आखाती देशांना दिलेल्या वचनांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते, असे फैजल यांनी बजावले होते. सौदीवर क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले वाढत असताना क्षेपणास्त्र यंत्रणा काढून घेण्याचा निर्णय योग्य ठरणार नसल्याचा दावाही त्यांनी केला होता.

काही परदेशी विश्‍लेषकांनी अफगाणिस्तानमधील माघारीनंतर सौदीसंदर्भात घेतलेला निर्णय अमेरिकेच्या प्रतिमेला धक्का देणारा ठरु शकतो, अशी नाराजी व्यक्त केली आहे. अफगाणिस्तानमध्ये आलेली तालिबानची राजवट व इराणमधील सत्तापालट तसेच वाढता धोका या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने क्षेपणास्त्र यंत्रणा माघारी घेण्याची घाई करायला नको होती, असा दावाही विश्‍लेषकांकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी सौदी अरेबियाने ‘पॅट्रियॉट’ क्षेपणास्त्रांसंदर्भात ग्रीसबरोबर करार केल्याचे समोर आले आहे.

leave a reply