‘हुवेई’च्या संचालिका ‘वँगझाऊ मेंग’ प्रकरणात अमेरिका आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करीत आहे

- मेंग यांच्या वकिलांचा आरोप

ओटावा/बीजिंग – चीनमधील ‘हुवेई’ या दूरसंचार क्षेत्रातील कंपनीच्या कार्यकारी संचालक वँगझाऊ मेंग यांच्या प्रकरणात अमेरिकेकडून कॅनडावर टाकण्यात येणारा दबाव आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करणारा असल्याचा आरोप मेंग यांच्या वकिलांनी केला. अमेरिकेचे कायदे चीनला लागू होऊ शकत नाही, असा दावाही मेंग यांचे वकील गिब वॅन अर्ट यांनी केला. कॅनडाच्या न्यायालयात मेंग यांच्यावरील खटला सुरू असतानाच चीनच्या एका राजनैतिक अधिकार्‍याने कॅनडाच्या पंतप्रधानांविरोधात मानहानीकारक वक्तव्य केल्याचे समोर आले आहे.

२०१८ सालच्या डिसेंबर महिन्यात, ‘हुवेई’ या दूरसंचार क्षेत्रातील कंपनीच्या कार्यकारी संचालक वँगझाऊ मेंग यांना कॅनडात अटक करण्यात आली होती. अमेरिकेने इराणवर लादलेल्या निर्बंधांच्या मुद्यावरून ‘हुवेई’ कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना लक्ष्य केल्याचे सांगण्यात येते. या अटकेला अमेरिका व चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापारयुद्धाचीही पार्श्‍वभूमी असून काही विश्‍लेषकांनी अमेरिकेने चीनवर दडपण वाढविण्यासाठी ही कारवाई घडवून आणल्याचा दावा केला होता.

दूरसंचार क्षेत्रात कार्यरत असणारी ‘हुवेई’ ही जागतिक स्तरावर दुसर्‍या क्रमांकाची कंपनी म्हणून ओळखण्यात येते. ही कंपनी चीनच्या आर्थिक व औद्योगिक प्रभावक्षेत्राचा महत्त्वाचा घटक म्हणून ओळखण्यात येते. हुवेई’चे संस्थापक ‘रेन झेंगफेई’ चीनच्या लष्करातील माजी अधिकारी असून सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे वरिष्ठ सदस्य आहेत. कॅनडाने मेंग यांची सुटका करावी, अन्यथा परिणामांसाठी तयार रहावे, असा इशाराही चीनकडून देण्यात आला होता.

मात्र कॅनडाने चीनच्या इशार्‍याकडे दुर्लक्ष केल्यानंतर चीनच्या सत्ताधारी राजवटीने कॅनडाचे माजी अधिकारी तसेच उद्योजकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई सुरू केली होती. पण त्यानंतरही कॅनडाने चीनला दाद न देता कारवाई पुढे चालू ठेवली आहे. सोमवारी कॅनडाच्या न्यायालयात मेंग यांच्या वकिलांकडून बचावाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यावेळी अमेरिकेकडून कॅनडावर टाकण्यात येणारा दबाव बेकायदेशीर असून, संपूर्ण कारवाईच चुकीची व आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन करणारी असल्याचे वक्तव्य वकिलांकडून करण्यात आले. त्याचवेळी चीनमध्ये घडलेल्या घटनेबाबत अमेरिका त्यांचे कायदे लागू करू शकत नाही, असा दावाही करण्यात आला.

कॅनडात सुनावणी सुरू असतानाच चीनच्या ब्राझिलमधील राजनैतिक अधिकार्‍यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्य्रुड्यू यांच्याविरोधात मानहानीकारक वक्तव्य केल्याचे समोर आले. ब्राझिलमधील चीनचे कॉन्सुल जनरल लि यांग यांनी ट्य्रुड्यू यांचा उल्लेख लहान मुलगा असा केला असून त्यांनी कॅनडाला अमेरिकेच्या इशार्‍यांवर धावणारा कुत्रा बनविल्याची अपमानकारक टिप्पणी केली आहे. यांग यांनी ट्विटर अकाऊंटवर हे वक्तव्य केल्याचे समोर आले आहे.

leave a reply