अमेरिका चिनी उत्पादनांवर लादलेले कर उठविणार नाही

- अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधींचा दावा

वॉशिंग्टन – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीत चीनच्या उत्पादनांवर लादण्यात आलेले कर उठविण्यात येणार नाहीत, असा दावा अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधींनी केला आहे. चीनवर लादलेले कर उठविल्यास अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला फटका बसू शकतो, असेही अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कॅथरीन ताई यांनी बजावले आहे. बायडेन प्रशासनाकडून चीनबाबत सौम्य धोरण राबविण्याचे संकेत मिळत असताना व्यापारयुद्धाच्या मुद्यावर घेण्यात आलेली भूमिका लक्ष वेधून घेणारी ठरते.

चीन व्यापारात अमेरिकेची लूट करीत आहे, असा आरोप करून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनविरोधात उघड व्यापारयुद्ध छेडले होते. २०१८ व २०१९ या दोन वर्षांमध्ये ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेत आयात होणार्‍या सुमारे ५५० अब्ज डॉलर्सच्या उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात कर लादले होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी चीननेही अमेरिकी उत्पादनांवर कर आकारण्यास सुरुवात केली होती. अमेरिका व चीन या दोन आघाडीच्या अर्थव्यवस्थांमध्ये सुरु झालेल्या व्यापारयुद्धाचा जबरदस्त फटका जागतिक अर्थव्यवस्थेलाही बसला होता.

मात्र तरीही ट्रम्प यांनी त्यापासून माघार घेण्यास स्पष्ट नकार दिला होता. ट्रम्प यांनी छेडलेल्या व्यापायुद्धाचे झटके बसल्यानंतर चीनने अमेरिकेबरोबर व्यापारी कराराच्या हालचाली सुरू केल्या होत्या. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात दोन देशांमध्ये ‘फेज १’ व्यापारी करारही झाला होता. या करारानुसार, चीन पुढील दोन वर्षात अमेरिकेच्या कृषी, उत्पादन, ऊर्जा यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रातून २०० अब्ज डॉलर्सहून अधिक आयात करणार होता.

अमेरिकेच्या उत्पादनांवर चीनने लादलेले करही कमी तसेच रद्द करण्यात आले होते. त्याबदल्यात अमेरिकेकडून चीनच्या १६० अब्ज डॉलर्सच्या निर्यातीवरील संभाव्य कर रद्द करण्यात आले होते. मात्र २५० अब्ज डॉलर्सच्या चिनी निर्यातीवर असलेले २५ टक्के कर कायम ठेवण्यात आले होते. अमेरिका व चीनमधील व्यापारी करार प्राथमिक टप्प्यातील असून चीनने त्याचे उल्लंघन केल्यास करार रद्द होऊन पुन्हा कर लादले जातील, असा इशारा अमेरिकेने दिला होता.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी, निवडणूक प्रचारमोहिमेदरम्यान ट्रम्प प्रशासनाने लादलेल्या करांमध्ये नजिकच्या काळात बदल करणार नसल्याचे आश्‍वासन दिले होते. बायडेन प्रशासनात अर्थमंत्री झालेल्या जॅनेट येलेन यांनीही गेल्या महिन्यात झालेल्या सुनावणीत चीनवरील करांचा बडगा कायम राहिल, असे स्पष्ट केले होते. व्यापार प्रतिनिधी कॅथरीन ताई यांच्या वक्तव्यातून त्याला दुजोरा मिळाल्याचे दिसत आहे.

‘अमेरिकेतील अनेक जण चीनवरील कर काढून टाका म्हणून सांगत आहेत. मात्र चीनवर लादलेले कर काढून घेतल्यास त्याचा मोठा फटका अमेरिकी अर्थव्यवस्थेला बसू शकतो. कर काढल्यानंतर होणार्‍या बदलांना अमेरिकी कंपन्या, व्यापारी, कामगार यासारखे घटक तयार असल्याशिवाय कर काढणे योग्य ठरणार नाही. वाटाघाटी करणारा पक्ष फायद्यापासून कधीच दूर जाणार नाही, हे लक्षात ठेवा’, या शब्दात व्यापार प्रतिनिधी कॅथरीन ताई यांनी चिनी उत्पादनांवर लादलेले कर काढले जाणार नाहीत, असे बजावले.

leave a reply