पाकिस्तानातून ब्रिटनमध्ये छुप्या रितीने युरेनियम पाठविले

- डर्टी बॉम्बच्या निर्मितीचा संशय

युरेनियमलंडन – ब्रिटनच्या हिथ्रो विमानतळावरुन युरेनियमचे पाकिट ताब्यात घेतले आहे. हे आण्विक साहित्य पाकिस्तानातून रवाना करण्यात आले होते. तसेच सदर पार्सल ब्रिटनमधील इराणी कंपनीच्या पत्यावर पाठविण्यात आले होते, अशी माहिती समोर येत आहे. याप्रकरणी तपास सुरू असून घाबरण्याचे कारण नसल्याचे ब्रिटनच्या यंत्रणांनी म्हटले आहे. पण यामुळे पाकिस्तानने तीन दशकांपूर्वी लिबिया, उत्तर कोरियाला आण्विक साहित्याची तस्करी केल्याचे प्रकरण नव्याने चर्चेत आले आहे.

ब्रिटनमधील आघाडीच्या वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार, 29 डिसेंबर रोजी ब्रिटनच्या प्रसिद्ध हिथ्रो विमानतळाच्या कार्गो विभागात विचित्र पार्सल जमा झाले होते. ओमानमधून दाखल झालेल्या प्रवासी विमानातून उतरविण्यात आलेल्या या पार्सलमध्ये धातूंचे साहित्य होते. यामध्येच दडविण्यात आलेले पॅकेट्स कर्मचाऱ्यांना आढळले. त्यांनी विमानतळावरील सुरक्षेला ही माहिती दिल्यानंतर सदर पार्सल कार्गोतून बाहेर काढण्यात आले.

विमानतळावरील व्यवस्था व ब्रिटिश पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर सदर विमानातील युरेनियमचे पार्सल पाकिस्तानातून रवाना करण्यात आल्याचे उघड झाले. ब्रिटनमधील इराणी कंपनीचा पत्ता या पार्सलवर होता, अशी माहिती समोर आली आहे. पण याबाबत अद्याप कुणालाही अटक झालेली नाही, अशी माहिती ब्रिटीश यंत्रणांनी दिली. तसेच जप्त करण्यात आलेले युरेनियम बॉम्बनिर्मितीच्या योग्यतेचे नव्हते. त्यामुळे अणुबॉम्ब निर्मितीच्या उद्दिष्टाने युरेनियमची तस्करी केल्याचा दावा यंत्रणांनी फेटाळून लावला.

पण या युरेनिअमवर प्रक्रिया करून त्याचा डर्टी बॉम्बसाठी वापर करण्याची शक्यता ब्रिटीश माध्यमे वर्तवित आहेत. ब्रिटनच्या सुरक्षा यंत्रणांनी तसेच माजी लष्करी अधिकाऱ्यांनी आपल्या देशावर डर्टी बॉम्बच्या हल्ल्याची शक्यता असल्याचा इशारा याआधीच दिला होता. त्यामुळे युरेनियमच्या तस्करीद्वारे ब्रिटनवरील डर्टी बॉम्बच्या हल्ल्याची तयारी केली जात होती, असे दावेही केले जात आहेत. पण या प्रकरणामुळे आण्विक तस्करी आणि पाकिस्तानचा त्यातील सहभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

1980 ते 90च्या दशकात पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमाचे जनक अब्दुल कादिर खान ऊर्फ ए. क्यू. खान यांनी लिबिया, उत्तर कोरिया या देशांना आण्विक साहित्य व तंत्रज्ञानाची तस्करी केली होती. पाकिस्तानच्या या बेपर्वाईमुळे उत्तर कोरियान अण्वस्त्रसज्ज झाल्याचा दावा केला जातो. या देशांना आण्विक साहित्याची तस्करी केल्याची खान यांनी जाहीर कबुली दिली होती.

पाकिस्तानातील अण्वस्त्रांची व आण्विक साहित्याची सुरक्षा हा आंतरराष्ट्रीय चिंतेचा विषय बनला आहे. दहशतवादी संघटनांचा सुळसुळाट असलेल्या या देशात अण्वस्त्रए व संवेदननशील आण्विक साहित्य सुरक्षित राहिलेले नाही, याचे वारंवार दाखले दिले जातात. काही आठवड्यांपूर्वी खुद्द अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनीच पाकिस्तानबाबत चिंता व्यक्त केली होती. पुरेशी सुरक्षा नसलेला आणि तरीही अण्वस्त्रधारी असलेला घातक देश, अशा शब्दात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी पाकिस्तानचे वर्णन केले होते.

ब्रिटनमध्ये पाकिस्तानातून पाठविण्यात आलेले युरेनियम अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची चिंता अनाठायी नसल्याचे दाखवून देत आहे.

leave a reply