अमेरिकी संसदेचे प्रतिनिधीगृह बायडेन प्रशासनाच्या निर्णयांची चौकशी करण्यासाठी समिती नेमणार

वॉशिंग्टन – अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधीगृहाने राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन व बायडेन प्रशासनातील विविध विभागांनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रतिनिधीगृहातील रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांनी यासंदर्भात उपसमिती नेमण्याच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली. ही उपसमिती अमेरिकेची आघाडीची तपासयंत्रणा ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’च्या (एफबीआय) कारवाईसह न्याय विभाग व व्हाईट हाऊसकडून देण्यात आलेल्या विविध निर्देशांची चौकशी करील, असे संकेत देण्यात आले आहेत. हा ठराव मंजूर होत असतानाच राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याशी निगडीत अभ्यासगटाच्या कार्यालयात गोपनीय कागदपत्रे सापडल्याची बातमी समोर आल्याने अमेरिकी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

biden chinaगेल्या आठवड्यात अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधीगृहात रिपब्लिकन पक्षाचे सदस्य केविन मॅकार्थी यांची सभापती म्हणून निवड झाली. या निवडीनंतर प्रतिनिधीगृहावर वर्चस्व मिळविलेल्या रिपब्लिकन पक्षाने आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. निवडीनंतर केलेल्या भाषणात मॅकार्थी यांनी निर्वासितांची अवैध घुसखोरी, चीनसंदर्भातील धोरण व बायडेन प्रशासनाचा भोंगळ कारभार यासारख्या मुद्यांना प्राधान्य देण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार, हालचालींना वेग आला असून उपसमितीच्या स्थापनेस दिलेली मान्यता त्याचा पहिला टप्पा मानला जातो.

us republicans‘सिलेक्ट सबकमिटी ऑन द वेपनायझेशन ऑफ द फेडरल गव्हर्मेंट’ असे या समितीचे नाव आहे. यात बायडेन प्रशासनाकडून करण्यात आलेला ‘एफबीआय’चा वापर हा प्रमुख मुद्दा असणार आहे. काही दिवसांपूर्वीच ‘एफबीआय’ने सोशल मीडिया कंपन्यांवर दबाव टाकून बायडेन यांच्याशी निगडीत अनेक गोष्टी प्रकाशित होण्यापासून रोखल्याचे प्रकरण समोर आले होते. यासंदर्भात ट्विटरवरून अनेक खळबळजनक गोष्टी समोर आल्या होत्या.

ज्यो बायडेन अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष असताना त्यांचा मुलगा हंटर बायडेन याने विविध कंपन्या स्थापन करून परदेशात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. यात प्रामुख्याने चिनी कंपन्यांचा समावेश आहे. या गुंतवणुकीच्या बदल्यात उपराष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी चीनच्या कलाचे अनेक निर्णय घेतले होते. यातून हंटर बायडेन व बायडेन कुटुंबातील इतरांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा झाल्याचे समोर आले. 2018 साली सरकारी वकिलांनी याची चौकशीही सुरू केली होती. 2019 साली हंटर बायडेन यांचा खाजगी लॅपटॉपही मिळाला होता. त्यातून मोठ्या प्रमाणात माहितीचा साठा मिळाला होता. मात्र एफबीआय व इतर अमेरिकी यंत्रणांकडून हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न झाले. त्यासाठी सोशल मीडिया कंपन्यांना हंटर बायडेनसंदर्भातील माहिती प्रसिद्ध करू नका, असे निर्देशही देण्यात आले होते.

Biden administration's decisionsमात्र आता या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याचे संकेत देण्यात आले असून त्यामुळे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या अडचणी वाढतील, असा दावा करण्यात येत आहे. रिपब्लिकन पक्ष बायडेन यांच्या चौकशीची तयारी करीत असतानाच त्यांच्याशी संबंधित एक नवे प्रकरण बाहेर आले आहे. बायडेन यांच्याशी संबंधित असलेल्या ‘पेन बायडेन सेंटर’ या अभ्यासगटाच्या कार्यालयात काही गोपनीय कागदपत्रे सापडली आहेत. यात युक्रेन, इराण व ब्रिटनशी संबंधित गोपनीय माहिती असल्याचे वृत्त ‘सीएनएन’ या अमेरिकी वृत्तवाहिनीने दिले आहे.

या प्रकरणावरून माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. ‘एफबीआय’ व इतर यंत्रणा बायडेन यांच्या घरांवर धाडी कधी टाकणार आहे, असा उपरोधिक टोला ट्रम्प यांनी लगावला आहे.

हिंदी

leave a reply