चीनचा प्रभाव रोखण्यावर अमेरिका-फ्रान्सचे एकमत – अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांची घोषणा

वॉशिंग्टन/पॅरिस – ‘आंतरराष्ट्रीय स्तरावरील चीनचा वाढता प्रभाव उदारमतवादविरोधी जागतिक व्यवस्थेच्या निर्मितीला बळ देऊ शकतो. ही शक्यता रोखण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील त्यासाठी अमेरिका व फ्रान्समध्ये एकमत झाले आहे’, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी घोषित केले. ब्लिंकन सध्या युरोपच्या दौर्‍यावर असून चीनला रोखण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या प्रयत्नांना युरोपिय मित्रदेशांची साथ मिळावी, हा यामागील उद्देश असल्याचे सांगण्यात येते.

दोन आठवड्यांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी उच्चस्तरीय शिष्टमंडळासह युरोपला भेट दिली होती. या दौर्‍यात झालेल्या ‘जी7’ व ‘नाटो’च्या बैठकीत अमेरिकेसह सदस्य देशांनी चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. ‘जी7’ व ‘नाटो’च्या बैठकीपाठोपाठ ‘युएस-ईयू समिट’ही पार पडली होती. या बैठकीत अमेरिका व युरोपिय महासंघाने व्यापार व तंत्रज्ञान क्षेत्रात चीनच्या वाढत्या प्रभावाला आव्हान देण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले होते. चीनला रोखण्याच्या मुद्यावर सातत्याने परस्परांच्या संपर्कात राहण्यावरही एकमत झाले होते.

एकमतया पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांचा युरोप दौरा महत्त्वाचा ठरतो. ‘चीनची प्रगती रोखणे किंवा त्याला मागे ढकलणे हा आमचा उद्देश नाही. पण जेव्हा खुल्या व मुक्त जागतिक व्यवस्थेचा मुद्दा समोर येतो, त्यावेळी आम्ही चीनच्या विरोधात खडे ठाकण्यास कचरणार नाही’, असा इशारा अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी दिला. कोणतीही व्यवस्था नसलेले व अराजकाने भरलेले जग नव्या संघर्षाकडे नेणारे ठरेल आणि कदाचित पुढे चीनचे वर्चस्व असलेली व्यवस्था त्यामुळे पहायला मिळेल, याकडेही ब्लिंकन यांनी लक्ष वेधले.

वर्षानुवर्षे चालत आलेल्या प्रचलित जागतिक व्यवस्थेला मिळणारे आव्हान मोडून काढणे व जनतेला चांगला पर्याय उपलब्ध करून देणे ही जगातील लोकशाहीवादी देशांची जबाबदारी असल्याचेही परराष्ट्रमंत्री ब्लिंकन पुढे म्हणाले. या मुद्यावर आपले व फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ईमॅन्युएल मॅक्रॉन यांचे एकमत झाल्याचा दावा अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी केला. अमेरिका व फ्रान्समध्ये असलेल्या समान मूल्यांचा धागा पकडून ब्लिंकन यांनी, चीनचा प्रभाव, कोरोनाव्हायरस व इतर मुद्यांवर अमेरिका आणि फ्रान्समध्ये सहकार्य तसेच समन्वय कायम राहिल, असा विश्‍वास व्यक्त केला.

अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी चीनच्या ‘बेल्ट अ‍ॅण्ड रोड इनिशिएटिव्ह’वरही टीकास्त्र सोडले. ‘‘अमेरिका व मित्रदेशांनी मांडलेली ‘बी3डब्ल्यू’ योजना चीनच्या ‘बेल्ट अ‍ॅण्ड रोड इनिशिएटिव्ह’ला योग्य पर्याय ठरेल. ‘चीनकडून इतर देशांना देण्यात येणारे सहाय्य सकारात्मक व चांगल्या उद्देशांनी देण्यात आलेले नाही. त्यामागे काही छुपे हेतू जोडलेले आहेत. चीनने कोरोना लसींचा वापरही इतर देशांवर दडपण आणण्यासाठी केला आहे’’, असा ठपका परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी यावेळी ठेवला.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या वाढत्या प्रभावाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली होती. मात्र ट्रम्प यांच्या या प्रयत्नांना युरोपिय देशांनी साथ दिली नव्हती. चीनकडून युरोपिय देशांमध्ये झालेली मोठी गुंतवणूक आणि आघाडीचा व्यापारी भागीदार म्हणून असलेला प्रभाव यामुळे युरोपिय देश ट्रम्प यांच्या चीनविरोधी मोहिमेत सहभागी व्हायला तयार नव्हते. मात्र कोरोनाच्या साथीसह मानवाधिकार व इतर मुद्यांवरून युरोपिय देशांमध्ये चीनच्या विरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. चीनला रोखणे अत्यावश्यक बनल्याची जाणीव आता युरोपिय देशांना झालेली आहे. म्हणूनच चीनबरोबरचा व्यापार व गुंतवणूकविषयक करार गुंडाळून युरोपिय महासंघाने चीनला धक्का दिला. आता फ्रान्ससारखा युरोपातील अत्यंत महत्त्वाचा देश चीनच्या विरोधात अमेरिकेशी सहकार्य करण्यास तयार झाला आहे, ही फार मोठी बाब ठरते. याआधी फ्रान्सने इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील आपल्या हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी भारताशी सहकार्य करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता. चीनच्या कारवायांमुळे या क्षेत्रात असमतोल व अस्थैर्य निर्माण झाल्याचे सांगून फ्रान्सने आपल्या भारताबरोबरील धोरणात्मक सहकार्याचे समर्थन केले होते.

leave a reply