अमेरिका व पोलंडचा युक्रेनचे तुकडे करण्याचा डाव

- रशियाच्या गुप्तचर प्रमुखांचा आरोप

युक्रेनचे तुकडेमॉस्को – अमेरिका व पोलंडने युक्रेनचे तुकडे करण्याचा डाव आखला आहे, असा खळबळजनक आरोप रशियाच्या गुप्तचर प्रमुखांनी केला. अमेरिका व पोलंड सरकारमध्ये यासंदर्भात बोलणी सुरू आहेत व पोलंड युक्रेनमधील काही अधिकारी तसेच नेत्यांच्याही संपर्कात आहे, असे रशियाचे गुप्तचर प्रमुख सर्जेई नेरिश्किन यांनी आपल्या आरोपात म्हटले आहे. पोलंडने हे आरोप फेटाळले आहेत. सदर आरोप रशियाच्या अपप्रचाराचा भाग आहे व रशिया पोलंड-युक्रेन सहकार्य तोडण्याचा प्रयत्न करीत आहे, असे प्रत्युत्तर पोलंडने दिले आहे.

रशियाचे गुप्तचर प्रमुख सर्जेई नेरिश्किन यांनी, रशियन गुप्तचर यंत्रणांना अमेरिका व पोलंडने आखलेल्या योजनेची माहिती मिळाल्याचे म्हटले आहे. या योजनेनुसार, पहिल्या महायुद्धाच्या कालावधीत पोलंडने केलेल्या कराराची पुनरावृत्ती घडविण्याच्या हालचाली सुरू आहेत. पहिल्या महायुद्धानंतर झालेल्या करारात पाश्चिमात्य मित्रदेशांनी पोलंडला युक्रेनच्या काही भागांचा ताबा घेण्याची परवानगी दिली होती. रशियातील क्रांतीपासून असलेला धोका टाळण्याचे कारण पुढे करून ही मान्यता देण्यात आली होती. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युक्रेनमधील लिव्ह शहरासह काही भाग पोलंडच्या ताब्यात होते. मात्र दुसऱ्या महायुद्धानंतर रशियाने त्यावर नियंत्रण मिळवून त्याचा सोव्हिएत संघराज्यात समावेश केला होता.

युक्रेनचे तुकडेरशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पोलंडने या योजनेवर पुन्हा काम सुरू केल्याचा दावा रशियन गुप्तचर प्रमुखांनी केला. गेल्या महिन्यात पोलंडने युक्रेनमधील शांतीसेनेच्या तैनातीसाठी घेतलेला पुढाकार याच योजनेचा हिस्सा असल्याचेही रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलंडने पश्चिम युक्रेनमध्ये जवळपास १० हजार जवान शांतीसैन्याच्या रुपात तैनात करण्याची तयारी दर्शविली होती. मात्र याला युरोपातील काही देशांनी विरोध दर्शविल्याने योजना बारगळल्याचे मानले जाते.

पण पोलंडने अमेरिका व युक्रेनशी बोलणी सुरू ठेवली आहे. युक्रेनच्या पश्चिम भागातील क्षेत्रावर पोलंड राजकीय व लष्करीदृष्ट्या नियंत्रण मिळवेल, असे योजनेचे स्वरुप असल्याची माहिती रशियाला मिळाली आहे, या शब्दात रशियाचे गुप्तचर प्रमुख सर्जेई नेरिश्किन यांनी पोलंडचा डाव उघड केला.

leave a reply