अफगाणिस्तानच्या काबुलमधील बॉम्बस्फोटामध्ये ५० जण ठार

काबुल – अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये दहशतवाद्यांनी घडविलेल्या बॉम्बस्फोटात ५० जण ठार तर ६० हून अधिक जण जखमी झाले. गेल्या २५ दिवसांमध्ये अफगाणिस्तानातील वेगवेगळ्या भागात झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये १०० हून अधिक जणांचा बळी गेल्याचे स्थानिक माध्यमे लक्षात आणून देत आहेत. यातील बहुसंख्य हल्ले अफगाणिस्तानातील अल्पसंख्यांक शियापंथियांना लक्ष्य करणारे असल्याची टीका होत आहे.

५० जण ठारशुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये ‘खलिफा साहिब’ प्रार्थनास्थळात दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडविला. या स्फोटात किमान ५० जणांचा बळी गेल्याची माहिती आंतरराष्ट्रीय माध्यमे स्थानिक नेत्याच्या हवाल्याने देत आहेत. स्फोटावेळी प्रार्थनास्थळात मोठी गर्दी होती. त्यामुळे बळींची संख्या शंभराच्याही पलिकडे जाऊ शकते, अशी भीती स्थानिक नेते व्यक्त करीत आहेत. तर काही स्थानिक माध्यमे या स्फोटात २०० जणांचा बळी गेल्याचे दावे करीत आहेत.

५० जण ठारचोवीस तास आधी अफगाणिस्तानच्या ‘मझार-ए-शरीफ’ येथील शियापंथियांच्या प्रार्थनास्थळावर दहशतवाद्यांनी दोन कारबॉम्बस्फोट घडविले. यामध्ये नऊ जणांचा बळी गेला तर दहा जण जखमी झाले होते. ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेने मझार-ए-शरीफ येथील बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली. गेल्या आठवड्यात याच भागातील आणखी एका प्रार्थनास्थळावर आयएसच्या दहशतवाद्यांनी स्फोट घडविला होता. यामध्ये ३३ जणांचा बळी गेला होता.

गेल्या महिन्याभरात अफगाणिस्तानच्या मुख्य प्रांतांमध्ये दहशतवाद्यांनी घडविलेल्या हल्ल्यांमध्ये १०० हून अधिक जणांचा बळी गेल्याचा दावा केला जातो. यामध्ये शियापंथियांना मोठ्या प्रमाणात लक्ष्य केल्याची टीका होतआहे. गेल्या आठवड्यात इराणने अफगाणिस्तानातील शियापंथियांवरील हल्ल्यांवर चिंता व्यक्त केली होती. तसेच तालिबानने हे हल्ले रोखण्यासाठी आणि हल्लेखोरांवर कारवाई करण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन इराणने केले होते.

leave a reply