अमेरिकेकडून युक्रेनला तीन अब्ज डॉलर्सच्या शस्त्रसहाय्याची घोषणा

शस्त्रसहाय्याची घोषणावॉशिंग्टन – युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने तब्बल तीन अब्ज डॉलर्सच्या शस्त्रसहाय्याची घोषणा केली आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसहाय्याची घोषणा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्याच आठवड्यात अमेरिकेने युक्रेनला 77 कोटी डॉलर्सहून अधिक शस्त्रसहाय्य जाहीर केले होते. बायडेन प्रशासनाने युक्रेनसाठी 50 अब्ज डॉलर्सहून अधिक निधीची तरतूद केली आहे.

बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी युक्रेनला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना नव्या शस्त्रसहाय्याची माहिती दिली. अमेरिका शेवटपर्यंत युक्रेनच्या पाठिशी उभी राहिल, अशी ग्वाहीदेखील बायडेन यांनी यावेळी दिली. नव्या घोषणेनंतर अमेरिकेने युक्रेनला दिलेल्या शस्त्रसहाय्याचे मूल्य 14 अब्ज डॉलर्सवर गेले आहे.

बुधवारी जाहीर झालेल्या शस्त्रसहाय्याअंतर्गत युक्रेनला थेट अमेरिकी शस्त्रकंपन्यांकडून शस्त्रसाठा पुरविण्यात येणार आहे. यात ड्रोन्स तसेच क्षेपणास्त्र व रॉकेट यंत्रणांवर भर दिला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. यापूर्वी अमेरिकेने दिलेल्या शस्त्रसहाय्यात हायमार्स सिस्टिम, जॅवलिन क्षेपणास्त्रे, सशस्त्र वाहने, तोफा, रायफल्स, रॉकेट्स, रडार सिस्टिम, तोफगोळे यांचा समावेश होता.

युक्रेनने अमेरिकेकडे लढाऊ विमाने तसेच क्षेपणास्त्रभेदी यंत्रणांची मागणी केली आहे. मात्र अमेरिका तसेच युरोपिय देश युक्रेनची ही मागणी पूर्ण करण्यास तयार नाहीत. ही मागणी मान्य केल्यास रशिया अधिक आक्रमकपणे युक्रेनवर तुटून पडेल, अशी भीती पाश्चिमात्य अधिकारी व्यक्त करीत आहेत.

leave a reply